इंडिया आघाडी फूट न पडता भक्कम राहील ः थोरात लोकसभा निवडणुकीबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी लोकसभेची निवडणूक ही देशाचे व राज्यघटनेचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यादृष्टीने जागा वाटपाचा विषय मोठा असतो. त्यामुळे जागा वाटपात काही इकडे-तिकडे होईल, परंतु इंडिया आघाडी कोणतीही फूट न पडता ती भक्कमच राहील, असा आशावाद काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी भक्कम आहे. परंतु इंडिया आघाडीत फूट पडत आहे याकडे आपण कसे बघता असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकदम भक्कम आहे. परंतु इंडिया आघाडीत जागा वाटपावरून थोडेफार झाले तरी फारसा फरक पडणार नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि आमचे इतर मित्रपक्ष असे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. आणि लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहोत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या ४८ जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैठका सुरू आहेत. जागा वाटपाबाबत योग्य तो निर्णय होईल, कोणाचा किती आकडा आहे याला महत्त्व नाही. परंतु ज्याठिकाणी जो सक्षम उमेदवार आहे आणि निवडून येण्याची ज्यांची खरी क्षमता आहे असा उमेदवार महाविकास आघाडीच्यावतीने दिला जाणार आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने उशिराने निमंत्रण दिले याबाबत आमदार थोरातांना विचारले असता ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आमचा सर्वांचा त्यांच्याशी संवाद चालू आहे. देश जेव्हा एखाद्या वेगळ्या वळणावर जात आहे. तसेच लोकशाही व राज्यघटना धोक्यात येत आहे. तेव्हा ती लोकशाही टिकवण्यासाठी आम्हा सर्वांना वेगळे राहून चालणार नाही. जे देशाची लोकशाही आणि राज्यघटना मोडीत काढायला निघाले आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्रित यावेच लागणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करुन लोकसभेची निवडणूक देशाच्या लोकशाहीची भवितव्य ठरवणारी होणार असल्याचेही म्हटले.

अध्यक्षाचा मान त्यांना द्यावाच लागतो ः थोरात
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार बाळासाहेब थोरात हे तिघेही निर्णय घेणार आहेत. आम्हाला अजून काही नेत्यांची गरज पडली तर त्यांनाही आम्ही बरोबर घेणार आहोत. नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे अध्यक्षाचा मान अध्यक्षाला द्यावा लागतो असेही थोरात यांनी सांगितले.

Visits: 16 Today: 1 Total: 113440

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *