आढळा खोर्‍यात वन विभागाची जनजागृती मोहीम बिबट्यापासून संरक्षण करण्याबाबत करताहेत मार्गदर्शन


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या आढळा खोर्‍यात दिवसेंदिवस बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. मानवी वस्तीतही बिबटे येत आहेत. बिबटे वावरत असतात ती जागा त्याचीच असते, परंतु, परंतु, माणसांच्या दृष्टीने ती जागा माणसांची असते. यामुळे हा संघर्ष वाढला असून, पुढेही तो वाढत राहण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांच्यासह कर्मचारी गावागावांत जावून बिबट्याच्या हल्ल्याविषयी व त्यापासून स्वतः व प्राण्यांचे संरक्षण कसे करावे, याबाबत जनजागृती करत आहेत.

सध्या अगस्ति कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी, बिबट राहण्याची जागा बदलत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभाग खबरदारीचा उपाय म्हणून देवठाण, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव या गावांत जावून बिबट्याच्या हल्ल्यापासून ते संरक्षणाबाबत जनजागृती करत आहे.

वाहनचालकांनी रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना खबरदारी घ्यावी. सतर्क राहून कोठेही बिबट्या आढळल्यास किंवा प्राण्यांवर हल्ले झाल्यास वन विभागास कळवावे. शिकार खात असल्यास त्याच्याजवळ जावू नये, अन्यथा अर्धवट शिकार राहिल्यास तो पुन्हा शिकार करण्याची व अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. बिबट्याला सहज प्रवेश करता येणार नाही, असे गोठे बांधावेत. रस्त्यांवर दिव्यांची सोय करावी. पकडलेल्या बिबट्याची जागा दुसरा बिबट्या घेतो, त्यामुळे बिबटे पकडून हा प्रश्न सुटणारा नाहीये. बिबट्या सहजा माणसांच्या जवळ जात नाही, त्यामुळे त्याला डिवचण्याचा प्रयत्न करु नये. शेतीच्या कामासाठी एकट्याने जावू नये, काम करताना मोठ्या आवाजात गाणी वाजवावीत किंवा मोठ्याने बोलावे. लहान मुलांना शक्यतो एकटे सोडू नये, विशेषतः संध्याकाळी अंगणात खेळताना लक्ष द्यावे, असे बिबट्यापासून सुरक्षिततेचे उपाय वनपरिमंडळ अधिकारी पंकज देवरे, वनरक्षक एकनाथ पारेकर, वनसेवक सुनील गोसावी, बाळासाहेब थोरात जनजागृती करुन सांगत आहे. याबाबतचे पत्रक, फलक गावोगावी ग्रामपंचायत अथवा दर्शनीय भागातही लावलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *