शंभर कोटी वसुलीचे धागेदोरे संगमनेर तालुक्यापर्यंत! सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकार्यांचे पोलीस उपायुक्तांच्या मूळगावी छापे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनातील मंत्र्याकडून दरमहा शंभर कोटी वसुलीचे ‘लक्ष्य’ दिले गेल्याच्या आरोपावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतांना आता या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे थेट संगमनेर तालुक्यातील पठारभागापर्यंत पोहोचले आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपात सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भुजबळ मूळचे तालुक्यातील आंबी खालसा येथील असल्याने मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने थेट त्यांच्या गावात धडक देत तब्बल तीन तास कसून चौकशी केली. या कारवाईबाबत फारशी माहीती नसल्याने तालुक्यात मात्र उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. मात्र नंतर केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करीत सदरचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याने जवळपास अर्धा डझनावर पोलीस अधिकारी व कर्मचारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले. त्या दरम्यान तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणाचे खापर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ‘शंभर कोटी’ वसुलीचे बिंग फुटले. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या मार्फत दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्याचे स्पष्ट केले होते.
सिंग यांनी पाठविलेल्या पत्रात 4 मार्च 2021 रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवास्थानी सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळही हजर असल्याचा उल्लेख आहे. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करणार्या सक्तवसुली संचालनालयाचे लक्ष्य भुजबळ यांच्या मूळगावी जाणारच होते, तो दिवस मंगळवारी (ता.27) उगवला. मुंबईतून केंद्रीय तपास यंत्रणेची नऊ सदस्य असलेली दोन पथके सकाळी साडेनऊच्या सुमारास पठारावरील आंबी खालसा या गावी पोहोचली. पोलीस उपायुक्त राजू भुजबळ नोकरीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह मुंबईतच राहतात, मात्र त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक येथेच असल्याने सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला महत्व प्राप्त झाले आहे. जवळपास तीन तास भुजबळ यांच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर त्यांचे जवाब नोंदवून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाची दोन्ही पथके माघारी फिरली. या प्रकराने तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई पोलीस दलात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या राजू भुजबळ यांचेही नाव शंभर कोटी रुपयांच्या वसुलीत आल्याने त्यांच्या मूळगावातील मालमत्तेविषयी व अन्य माहिती मिळविण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) अधिकार्यांनी मंगळवारी थेट संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे छापा घातला. जवळपास तीन तासांच्या चौकशीतून अधिकार्यांच्या हाती काय लागले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही, मात्र राज्याचे राजकीय वातावरण गढूळ करणार्या प्रकरणाचे ओघळ संगमनेर तालुक्यापर्यंत पोहोचल्याने उलटसुलट चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे.