धांदरफळ घटनेतील तिसर्‍या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी! डीजेच्या वाहनाने वरात चिरडल्याचा प्रकार; लोकवर्गणीतून मुंबईत सुरु होते उपचार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे डीजेचे वाहन वरातीत घुसून भीषण अपघात घडला होता. या भयानक घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात जखमी झालेल्या अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळाने त्याच्यावरही झडप घातली असून त्या दुर्दैवी अपघातात आता त्याच्या रुपाने तिसरा बळी गेला आहे. या वृत्ताने धांदरफळ खुर्दच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली असून गावातील तणावातही भर पडली आहे. आज सायंकाळी उशिराने मुंबईहून त्याचा मृतदेह गावात आणला जाणार आहे.

पंधरवड्यापूर्वीच्या गुरुवारी (४ जानेवारी) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ खुर्दमध्ये सदरचा प्रकार घडला होता. या घटनेत गावातील किसन रंगनाथ खताळ यांचा मुलगा बिपीन याचे वर्‍हाड वाजतगाजत रणखांब येथे निघाले होते. त्यावेळी नवरदेव पाठवणीच्या मिरवणुकीसाठी डीजेचे वाहन मागवण्यात आले होते. गावातील मारुती मंदिरात दर्शन घेवून ही मिरवणूक मार्गस्थ होत असतानाच अचानक डीजेच्या वाहनचालकांची अदलाबदल झाली. त्यावेळी नव्याने वाहनचालक म्हणून रुजू झालेल्या चालकाने वाहनाच्या ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय ठेवल्याने अचानक वाहनाचा वेग वाढून त्याने समोरील बाजूस नाचणार्‍या वर्‍हाडींना चिरडले.

या भयानक दुर्घटनेत बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८) यांचा वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला, तर भास्कर राघू खताळ (वय ७३) यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे, रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ असे सहाजण गंभीर जखमी झाले होते. त्यातील अभिजीत ठोंबरे (वय २२) या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने स्थानिक रुग्णालयाने त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्याला त्याच दिवशी रात्री उशिराने मुंबईला हलविण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर तेथेच उपचार सुरु होते.

रविवारी (ता.१४) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली त्यावेळी त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र आज (ता.१५) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याला रक्ताची उलटी झाल्याने तो गंभीर झाला आणि त्यातच मृत्यूशी गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेला त्याचा संघर्षही थांबला. आज दुपारी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी होवून तो त्याच्या मूळगावी धांदरफळकडे पाठवण्यात आला आहे. सायंकाळी उशिराने त्याच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी अपघातात धांदरफळमधील तिसरा बळी गेल्याने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

आई-वडील, आजी आणि लहान भाऊ अशा साधारण कुटुंबातील अभिजीत उर्फ गणेश ठोंबरे (वय २२) हा तरुण घरातील कमवता मुलगा होता. अतिशय मनमिळाऊ, मीतभाषी आणि गावातील सगळ्यांशीच मिसळून राहणारा तरुण अशी त्याची ओळख होती. आपल्या मित्राचे लग्न म्हणून आनंदाने त्याच्या वरातीत नाचत असतानाच डीजेचे वाहन बेकाबू होवून त्याखाली तो चिरडला गेला. सदरील वाहनाचे चाक मांडीवरुन गेल्याने त्याच्या कंबरेखालील भागाचा चेंदामेंदा झाला होता. मयत ठोंबरे याच्या घरची स्थिती जेमतेम असल्याने गावकर्‍यांनीच वर्गणी गोळा करुन त्याच्या उपचारांना मदत केली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि अखेर दहा दिवसानंतर काळाने त्याच्यावर झडप घातलीच. त्याच्या मृत्यूची वार्ता गावात येवून धडकल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली असून गावातील वातावरणात तणावाचीही भर पडली आहे.

..तर अपघात टळला असता!
तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रात ‘डीजे’ वाजवण्यास बंदी घातल्याचे ठराव केले आहेत. धांदरफळ खुर्दमध्येही अपघाताच्या दहा दिवस आधीच तसा ठराव करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या ठरावाची प्रत तालुका पोलिसांपर्यंत पोहोचलीच नाही. ४ जानेवारी रोजी सदरची घटना घडल्यानंतर गावातील काहींनी ‘त्या’ ठरावाची प्रत पोलिसांना सोपवली, मात्र तोपर्यंत बराचवेळ निघून गेलेला होता आणि त्याने तिघांचा बळीही ठरवला होता. धांदरफळ ग्रामपंचायतीने वेळीच ठरावाची प्रत पोलिसांना दिली असती तर कदाचित झालेला अपघात टाळता आला असता आणि त्यातून मृत्यूमुखी पडलेल्या तिघांना वाचवता आले असते अशी चर्चा सध्या धांदरफळ खुर्दमध्ये सुरु आहे.

Visits: 34 Today: 1 Total: 117654

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *