संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हा ः नवले काँग्रेसच्यावतीने देश पातळीवर करण्यात येणार जनआंदोलन


नायक वृत्तसेव, संगमनेर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात समर्थ राज्यघटना असून सध्या घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. विरोधकांचा आवाज बंद करण्याचे काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या काँग्रेसच्या जनआंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी केले आहे.

विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे होते. पुढे बोलताना मधुकर नवले म्हणाले, लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही महत्त्वाचे असून भाजप सरकारकडून मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा लोकशाहीला मोठा धोका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तरे देत नाहीत. तातडीने त्यांचे निवासस्थान खाली करून घेतले जात आहे. खासदारकी रद्द केली जात आहे, ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. हे रोखण्यासाठी व देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसच्यावतीने देश, जिल्हा, तालुका, आणि गाव पातळीवर जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. सत्याग्रही मार्गाने सर्व आंदोलन होणार असून देशाच्या हितासाठी सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

तर मिलिंद कानवडे म्हणाले, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. मात्र काँग्रेस पक्ष हा त्यागातून व बलिदानातून उभा राहिलेला पक्ष आहे. विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात, जिल्ह्यात व तालुक्यात सत्याग्रही मार्गाने विविध आंदोलने केले जाणार आहेत. मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी हे देशाचे एकांगी चित्र दाखवत असून तरुणांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ लढ्यासाठी संघटित होऊन काँग्रेसच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन केले.

Visits: 82 Today: 1 Total: 1098298

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *