रेमडेसिवीर इंजेक्शन लवकर उपलब्ध करुन द्या! अन्यथा शिर्डी महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा
![]()
नायक वृत्तसेवा, शिर्डी
अन्न व औषध प्रसासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाभरातील मेडिकलची यादी जाहीर करून अधिसूचना काढली. मात्र राहाता तालुक्यातील शिर्डीतील कोविड सेंटरमध्ये सर्वाधिक रुग्ण असताना शिर्डीतील एकाही मेडिकलचा या यादीत समावेश नाही. येत्या दोन दिवसांत राहाता व शिर्डी येथे 10 मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

याबाबत महाविकास आघाडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, काँग्रेसचे डॉ.एकनाथ गोंदकर, सचिन चौघुले, संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर, अमृत गायके, उमेश शेजवळ यांनी म्हटले आहे की, राहाता तालुक्यातील साईसंस्थानचे कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड बनले आहे. मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. अन्न व औषधे प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत शिर्डीतील मेडिकलचा समावेश नाही. केवळ प्रवरा मेडिकलचे नाव आहे. म्हणजे रुग्ण शिर्डीला व इंजेक्शन प्रवरानगरला हे अयोग्य आहे. प्रवरा मेडिकलबरोबरच राहाता व शिर्डीतील मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध करुन देणे गरजेचे असताना तसे मात्र झाले नाही, ही अन्यायकारक बाब आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी दखल घ्यावी. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यामार्फत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे अन्न व भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची तक्रार करणार आहोत. येत्या दोन दिवसांत शिर्डी व राहाता येथील मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाविकस आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.
