साईसंस्थानला भक्ताकडून अठरा लाखांचा फ्लॅट दान दानशूर गितीका सहानी यांचा संस्थानने केला सत्कार

नायक वृत्तसेवा, शिर्डी
सबका मालिक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या दरबारात देश-विदेशातील साईभक्त भरभरुन दान करतात. शुक्रवारी (ता.१२) छतीसगड येथील साईभक्ताने साईबाबा संस्थानला स्वतःचा १८ लाख रुपये किमतीचा फ्लॅट दान केला आहे. तीन दिवसांपूर्वी बेंगलोरच्या साईभक्ताने तब्बल अर्धा किलो वजनी २९ लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला होता. आता साईभक्ताने फ्लॅट दान केल्याने साईबाबांवरील भक्तांचे प्रेम आणि श्रद्धा पुन्हा एकदा समोर आले आहे.

गितीका सहानी (रा. दिल्ली राजहरा, जि. बालोद, छत्तीसगड) यांनी त्यांचे मालकीचे शिर्डीमधील इमारतीतील दुसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २१ चे क्षेत्र ५१.०९ चौ. मी. ही मिळकत साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांना नोंदणीकृत दानपत्राद्वारे देणगी स्वरूपात दिली आहे. या मिळकतीची किंमत रक्कम रुपये १८ लाख २४ हजार इतकी आहे. याचे दानपत्र करून घेणेकामी साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मालमत्ता विभागाचे प्रभारी अधीक्षक विठ्ठल बर्गे हे हजर होते. गितीका सहानी यांच्याकडून या फ्लॅटची चावी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी स्वीकारली.

यावेळी दानशूर महिला साईभक्त गितीका सहानी यांचा साई संस्थानच्यावतीने प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी सत्कार केला. यावेळी मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी दहा दिवसांत तब्बल १६ कोटी रुपये साईंच्या झोळीत दानस्वरूपी दिले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच २९ लाखांचा सुवर्ण मुकुट आणि १८ लाखांचा फ्लॅट साईभक्तांनी साईचरणी अर्पण केला आहे.
