‘घार्गे-कोकरें’ची जोडी सोडवणार वाहतुकीची जटील समस्या! शहरातील सिग्नलची दुरुस्ती सुरु; आठवडाभरात नियमनाची शक्यता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवसोंदिवस जटील होत असलेली संगमनेरची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अखेर मुहूर्त लागला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी गेल्या महिन्यातील आपल्या संगमनेर भेटीत या विषयावर धोरणात्मक निर्णय घेण्याचे संकेत देताना सिग्नलची आवश्यकता अधोरेखीत केली होती. त्या अनुषंगाने पंधरा दिवसांत पूर्तता करुन 15 जूनपर्यंत सिग्नलद्वारे वाहतूक संचालन करण्याचे निर्देशही त्यांनी शहर पोलिसांना दिले होते. मात्र या कालावधीत कोणतीही विशेष कारवाई न झाल्याने शहर पोलिसांनी चक्क अधिक्षकांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्रही समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर दैनिक नायकने आपल्या 14 जूनच्या अंकात ‘पोलीस अधिक्षकांची घोषणा हवेतच विरणार!’ या मथळ्याखाली पालिका व पोलिसांच्या समन्वयावर झोत टाकणारे वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी शहरातील सर्व सिग्नलची दुरुस्ती हाती घेतली आहे. त्यामुळे लवकरच शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नलव्यवस्था कार्यान्वीत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
जिल्ह्यातील प्रगत शहरांच्या पंक्तित अग्रणी असलेल्या संगमनेर शहराचा गेल्याकाही दशकांत प्रचंड विस्तार झाला आहे. मात्र वेगाने वाढणार्या शहराचा आराखडा तयार करताना तत्कालीन बांधकाम अभियंत्यांनी शहराची वाट लावल्याने त्याचे दृष्य परिणाम वाहतुकीवर झाले असून अरुंद आणि अतिक्रमित रस्त्यांमुळे जागोजागी वारंवार होणारी वाहतूक कोंडी शहराची समस्या बनली आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेने 35 लाखांचा खर्च करुन पाच ठिकाणी सिग्नलही बसवले होते. मात्र मनमानी कारभार आणि पोलिसांशी समन्वयाचा अभाव यामुळे इतका मोठा खर्च करुनही आजवर कधीही या सिग्नलचा वापर न झाल्याने त्यातील काही गंजून खराब झाले आहेत. तर, काही नादुरुस्त होवून अडगळीत गेले आहेत. त्यामुळे शहरात उभारलेली सिग्नल व्यवस्था सुरु होण्यापूर्वीच खड्ड्यात गेल्याची स्थिती असताना आता जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हाकेला पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी प्रतिसाद दिल्याने ती पुनर्जिवित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात (ता.23) पदभार स्वीकारल्यानंतर संगमनेरात आलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी शहरातील जटील वाहतूक व्यवस्थेचा विषय समोर आल्यानंतर त्यांनी 15 जूनपर्यंत शहरातील सिग्नल व्यवस्था कार्यान्वीत करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक सुरुळीत रहावी यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत सकारात्मकता दाखवताना गुंडाळण्यात आलेली वाहतूक शाखा पुन्हा सुरु करता येईल का याबाबत माहिती घेवून निर्णय घेण्याचेही आश्वासन दिले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर गेली अनेक वर्ष गचाळ वाहतुकीचा त्रास सहन करणार्या संगमनेरकरांना दिलासा मिळाला असताना 15 जूनपर्यंत मात्र पालिका अथवा पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने साशंकताही निर्माण झाली होती.
याबाबत दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना आपल्या 14 जूनच्या अंकात ‘पोलीस अधिक्षकांची घोषणा हवेतच विरणार!’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन संगमनेर पोलिसांची निष्क्रियता आणि पालिकेचा असहकार यावर झोत टाकला होता. त्याची दखल घेत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी शहरातील सिग्नलची दुरुस्ती हाती घेतली असून अकोलेनाका, दिल्लीनाका, बसस्थानक चौक व काश्मिर हॉटेलजवळील सिग्नलची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे. आठवडाभरात दुरुस्तीचे काम पूर्ण करुन ते पोलिसांकडे हस्तांतरीत करणार असल्याची माहितीही मुख्याधिकार्यांनी दैनिक नायकला दिली असून त्यावरुन येत्या आठवड्यात शहरातील बेशिस्त वाहतुकीला सिग्नलचा नियम लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘घार्गे-कोकरें’ची जोडी!
पूर्वी श्रीरामपूर विभागाच्या उपअधिक्षकपदी कामाचा अनुभव असलेल्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पदभार स्वीकारताच संगमनेरला भेट दिली. त्यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरेही त्यांच्या स्वागतासाठी जातीने हजर असल्याने पत्रकारांमध्ये काहीसे आश्चर्य निर्माण झाले होते. मात्र घार्गे यांच्या आगमनानंतर काही वेळातच त्यावरील पडदा हटून दोघेही वर्गमित्र असल्याचे समोर आले. त्यातच शहराच्या वाहतुकीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावरील उत्तरात पोलीस अधिक्षकांनी 15 जूनपर्यंत सिग्नल कार्यान्वीत करण्याचे आदेश देवूनही शहर पोलिसांनी कोणतीच हालचाल केली नाही. मात्र मुख्याधिकार्यांनी मित्राचा शब्द झेलून पडून असल्याने नादुरुस्त झालेल्या सिग्नलची दुरुस्ती हाती घेतल्याने ‘घार्गे-कोकरें’ची जोडी संगमनेरची जटील वाहतूक समस्या सोडवणार अशी नवी चर्चा शहरात सुरु झाली आहे.