पतंग उडवताय… मग महावितरणने केले सावधान! वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, नगर
मकर संक्रात म्हणजे आनंदाचा सण. या सणात सर्व वयोगटातील अनेक नागरिकांना रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा मोह आवरता येत नाही. यावेळी उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे पतंग उडवताना काही दुर्घटना होऊ नये, याची सावधगिरी बाळगण्यासाठी वीज यंत्रणेपासून दूर राहूनच पतंग उडवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
मकरसक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फीडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी. आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली आहे. दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, चायना मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करीत पतंग उडवताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडवताना विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात, अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी पाइपाच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी अनेकदा विद्युत तारेला स्पर्श होऊन जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढताना एका तारेवर दुसर्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे प्राणांकित अपघात होतो. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.
प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तित्वात आहेत. वीजवाहिन्यांच्या परिसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवतात. अनेक पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. यावेळी पतंग काढताना अनेकदा अपघात घडतात. मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी आहे. या मांजावर धातूमीश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो, असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाही मांजा वापरु नये. नागरिक आणि लहान मुलांनी वीजवाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा.
पालकांनी सतर्क राहावे!
पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडवण्याबाबत मार्गदर्शन करावे व सोबत राहावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सतर्कता व सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.