संगमनेर खुर्दमधील ढाब्यांवर सर्रास होणारी बेकायदा दारु विक्री थांबवा! राज्य दारुबंदी कृती समितीचे निवेदन; उत्पादन शुल्क विभागाच्या हप्ताखोरीवरही ठेवले बोटं..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य उत्पादन शुल्क विभागातील वाढत्या हप्तेखोरीमुळे ग्रामीणभागातील असंख्य हॉटेल्स व ढाब्यांवर बेकायदा दारुविक्रीचे स्तोम माजले असून त्यातून संगमनेर तालुक्याची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याबाबत स्थानिक अधिकार्यांकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना विभागातील अधिकार्यांचेच पाठबळ असल्याचेही वेळीेवेळी उघड झाले आहे. अशा बेकायदा कृत्यांकडे अधिकार्यांचा अर्थपूर्ण कानाडोळा संगमनेरचे सामाजिक स्वास्थ बिघडवणारा असून संगमनेर खुर्दसह तालुक्यातील अशा सर्व बेकायदा दारु व्यवसायांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी निवेदनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे केली आहे.

याबाबत कतारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मागील काही दिवसांपासून दारुबंदी तथा राज्य उत्पादन शुल्क विभागातील हप्तेखारी मोठी प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पूर्वी काही हॉटेल्स व ढाब्यांपूरती मर्यादीत असलेली बेकायदा दारु विक्री आज सर्रास झाली आहे. अशा ठिकाणी मिळणार्या बेकायदा दारुला कोणतेही नियम नसल्याने त्यातून रासायनिक दारुचीही विक्री होते. त्यातून एखादी दुर्घटना घडण्याचीही शक्यता कायम असल्याने विभागाने या बेकायदा धंद्यांच्या दुष्परिणांमाचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

पुणे-नाशिक बायपास मार्गाची निर्मिती झाल्यानंतर संगमनेर खुर्दच्या पंचक्रोशीत अनेक हॉटेल्स व ढाबे उभे राहीले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात या गावाचे शिवार फूड हब म्हणूनही समोर आले आहे. त्यातून एकीकडे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्या तरीही दुसरीकडे या व्यवसायात असामाजिक तत्त्वांचाही शिरकाव झाल्याने त्यातून अवैध व्यवसायांचीही वाढ झाली आहे. त्यात बेकायदा दारु विक्री जोमात असून राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी व कर्मचार्यांना हाताशी धरुन अशा उद्योगांना एकाप्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे.

हप्तेखोरीच्या सवयींमुळे संगमनेरचा उत्पादन शुल्क विभाग सूस्त झाला असून नागरीकांकडून केल्या जाणार्या तक्रारही ऐकून घेतल्या जात नाहीत इतकी या विभागाची अवस्था वाईट झाली आहे. बेकायदा पद्धतीने दारु विक्री करणार्या हॉटेल्स व ढाब्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी विभागाचे अधिकारी खबर्यांमार्फत माहिती काढून आपले मासिक हप्ते ठरवून घेत असल्याचा घणाघाती आरोपही कतारी यांनी या निवेदनातून केला आहे. संगमनेर खुर्दचा परिसर अशा व्यवसायांमुळे सतत चर्चेत असून दारु पिवून दररोज होणार्या भांडणांमध्ये वाढ होत आहे. त्यातून शांतता व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. या व्यवसायांची माहिती घेवून संगमनेर व अहमदनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी फोनही केले, मात्र संबंधित अधिकारी फोनही घेत नाहीत आणि कारवाईही करीत नाहीत अशी सध्याची अवस्था आहे. त्यामुळे हप्तेखोरीच्या नावाने आधीच बदनाम असलेल्या या विभागाची राहीलेली विश्वासार्हताही आता शेवटच्या घटका मोजू लागली असून वरीष्ठपातळीवरुन ठोस कारवाई न झाल्यास विभागाच्या इभ्रतीची लक्तरे संगमनेरच्या वेशीवर लटकतील अशा गर्भीत इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनातील विषयाचा गांभिर्याने विचार करुन संगमनेर खुर्दसह संपूर्ण तालुक्यात सुरु असलेली बेकायदा दारु विक्री थांबवावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.

संगमनेरचा राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे असून अडचण-नसून खोळंबा असा आहे. हा विभाग स्वतःहून तर सोडाच, पण, नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही काहीच करीत नाही. त्यामुळे संगमनेरच्या या विभागाची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे. काही अधिकारी व कर्मचार्यांच्या हप्तेखोरीमुळे संपूर्ण विभागाच संशयाच्या वर्तुळात आल्याने वरीष्ठांनी याची गांभिर्याने दखल घेवून संगमनेर तालुक्यातील असंख्य हॉटेल्स व ढाब्यांवर सुरु असलेली बेकायदा दारुविक्री थांबवावी, अन्यथा यातून एखादी गंभीर घटना घडून तालुक्यातील सामाजिक सौहार्द धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
– अमर कतारी
ग्रामीण जिल्हाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समिती

