निमजमध्ये डीजे बंदीच्या निर्णयाला सपशेल हरताळ! ग्रामपंचायत पदाधिकारीच जबाबदार असल्याचा महिलांचा आरोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमज गावात डीजे बंदीच्या ग्रामपंचायतच्या निर्णयाला सपशेल हरताळ फासण्यात आला आहे. १५० महिलांनी केलेल्या ग्रामपंचायत ठरावाला देखील ‘त्या’ मंडळींनी जुमानले नाही. त्यामुळे याला ग्रामपंचायत पदाधिकारीच जबाबदार असल्याचे मत गावातील महिलांनी व्यक्त केले आहे.
लग्नसमारंभ, वराती, वाढदिवस, विजयी मिरवणुका, यात्रौत्सव यांसारख्या सर्वच कार्यक्रमांमध्ये सर्वत्र डीजेचा दणदणाट ऐकायला येत असतो. डीजेच्या डेसिबलवर पोलीस प्रशासनाने मर्यादा घालून दिलेली असतानाही नियम पायदळी तुडवत डीजे वाजविले जात आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे गावातील वयोवृद्ध व लहान मुलांना त्रास होत आहे. ज्येष्ठांसह लहान मुलांना हृदयविकाराचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे संपूर्ण निमज गावातून डीजेला हद्दपार करण्यासाठी गावातील महिला पुढे सरसावल्या आणि त्यांनी ग्रामपंचायतला याबाबत अर्ज करून ठराव मांडला. त्याला सरपंच, उपसरपंच यांनी तत्काळ मान्यता देत गावच्या हिताचा निर्णय घेतला. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाजवल्या जाणार्या वाद्यांना सुगीचे दिवस येतील असे वाटत होते.
परंतु दोन दिवसांपूर्वी गावात पुन्हा डीजेचा आवाज घुमला. यावेळी काही महिलांनी सरपंच यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या डीजेला ग्रामपंचायत पदाधिकारीच जबाबदार असल्याचा दावा गावातील महिला करत आहे. विशेष म्हणजे काही महिलांनी सदस्याला फोन केला असता, ‘डीजे बंदीचा ठराव मांडलाच नाही’ असे त्याने उत्तर देऊन कहर केला. त्यामुळे महिला चांगल्याच संतप्त झाल्या असून ‘तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही’ अशी प्रतिक्रिया गावातील महिला देत आहेत.
गावातील दीडशे महिलांच्या सह्यांनी डीजे बंदीचा ठराव दिलेला असताना ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या नाकावर टिच्चून गावात डीजे वाजवला गेला. आम्ही उपसरपंच यांना फोनवर जाब विचारला असता त्यांनी ११२ नंबरवर फोन करायचा अजब सल्ला दिला. मात्र त्यांनी स्वतः फोन करून प्रशासनाला कळवले नाही किंवा डीजेवर काही कारवाई केली नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकार्यांची डीजेला मूकसंमती असल्याचे दिसून येते.
– संतप्त महिला, निमज