मालदाड-नान्नजसह इतर मंजूर रस्त्यांना तांत्रिक मान्यता द्या ः थोरात विधानसभेत मांडली लक्षवेधी; तातडीने मंजुरी देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत महाराष्ट्रात अनेक रस्त्यांची कामे सुरू असून संगमनेर तालुक्यातील मालदाड- सोनोशी ते चिंचोली गुरव, गुंजाळवाडी, राजापूर व इतर रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र तांत्रिक मान्यता न मिळाल्याने काम सुरू होत नाही. तरी पावसाळ्यापूर्वी कामे सुरू होण्यासाठी तातडीने या कामांना तांत्रिक मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे तांत्रिक मान्यतेअभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरीची मागणी करताना आमदार थोरात म्हणाले, महाराष्ट्रात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत केंद्र सरकारकडून 412 रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील मालदाड-सोनोशी-बिरेवाडी-नान्नज दुमाला-चिंचोली गुरव-आशा पीरबाबा चौफुली जिल्हा हद्द या 19.17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 15 कोटी 16 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तर राष्ट्रीय महामार्ग 60 घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी-राजापूर-चिखली वर्पे वस्ती या 11 किलोमीटरच्या रस्त्याला 9 कोटी 62 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तसेच तिरंगा चौक-संगमनेर नगरपालिका हद्द- मालदाड या 6 किलोमीटर रस्त्याकरीता 4 कोटी 37 लाख रुपये मंजूर आहेत. आणि दरेवाडी ते कौठे मलकापूर या 6 किलोमीटर रस्त्याकरीता 4 कोटी 64 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता आहे. या कामांच्या निधी मंजुरीस दोन महिने उलटून गेले तरी या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत.

मालदाड-सोनोशी-नान्नज दुमाला हा रस्ता उत्तर भागातील गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्याच्या कामाकरीता आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रशासकीय मान्यता होऊन सुद्धा तांत्रिक मान्यता न मिळाल्याने ही कामे रखडलेली आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे होण्याकरीता सरकारच्या ग्रामविकास विभागाने तातडीने या रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता द्यावी अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आजच तातडीने या रस्त्यांची रखडलेली तांत्रिक मान्यता देण्यात येईल असे आमदार थोरात यांना सभागृहात आश्वासित केले.

Visits: 113 Today: 2 Total: 1110782

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *