छेडछाड प्रकरणी महाविद्यालय व्यवस्थापनावर कारवाई करा : आरपीआय विद्यार्थिनीची तक्रार मिळताच सदर प्राचार्याला कार्यमुक्त केले होते : महाविद्यालय व्यवस्थापन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात शहरातील डॉ.वामनराव इथापे वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न करणार्‍या लिंगपिसाट प्राचार्य आरशू पीरमोहम्मद पटेल यांचे बिंग मूळच्या बीड जिल्ह्यातील 21 वर्षीय तरुणीने फोडले होते. या प्रकरणात त्याला पोलिसांनी तत्काळ अटक करुन त्याची रवानगी गजाआडही केली होती. मात्र आता पुन्हा एकदा तेच प्रकरण समोर आले असून यावेळी रिपब्लिकन पाटी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी सोमवारी उपविभागाीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेत या प्रकाराला ‘त्या’ महाविद्यालयाचे व्यवस्थापनही कारणीभूत असल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. आपल्या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.

प्राचिन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी विजेरी असंही अलिकडच्या काळात या नात्याविषयी सांगितले जाते. मात्र या नात्यालाच काळिमा फासणारी घटना गेल्या महिन्यात डॉ.वामनराव इथापे वैद्यकीय महाविद्यालयातून समोर आली होती. विशेष म्हणजे या प्रकरणी मूळच्या बीड जिल्ह्यातील 21 वर्षीय पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत या महाविद्यालयाचा प्राचार्य आरशू पीरमोहम्मद पटेल याला अटकही केली होती, सध्या तो सध्या तुरुंगातच आहे. या घटनेला पंधरा दिवसांहून अधिक कालावधी गेल्यानंतर आता काही संघटनांनी पुन्हा या प्रकरणाला नव्याने हवा देण्याचा प्रयत्न सुरू केला असून सोमवारी आरपीआय (आठवले) गटाने मोर्चाने येवून उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील 21 वर्षीय तरुणीने संगमनेरातील डॉ.वामनराव इथापे वैद्यकीय महाविद्यालयात डी.फार्मसीच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. तेव्हापासून या महाविद्यालयाचा प्राचार्य आरशू पीरमोहम्मद पटेल हा तिला मानसिक त्रास देवून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न करीत होता. या गोष्टीला कंटाळून संबंधित विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रारही केली होती. मात्र व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष करीत सदर प्राचार्याच्या दुष्कृत्यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला व संबंधितावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात ते देखील दोषी असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

सदर निवेदन देण्यासाठी सोमवारी आरपीआयचे (आठवले गट) कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चाने उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयात आले. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, अलंकार जाधव, नीता जाधव, श्रावण वाघमारे, भीमराज बागुल, अशोक खरात, पप्पू गोडसे, योगेश मुन्तोडे, नवशाद शेख, शहनवाज बेगमपुरे, विजय मुन्तोडे, मधुकर सोनवणे, विजय खरात, विकास गायकवाड, रमेश भोसले, जनार्दन साळवे, शरद जमधडे व संतोष घेगडमल आदिंच्या सह्या आहेत.

संबंधित विद्यार्थिनीने व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर तत्काळ त्याची दखल घेवून सहा महिन्यांपूर्वीच महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने प्राचार्य आरशू पीरमोहम्मद पटेल याला सेवामुक्त केले होते. सदरचा प्रकार अत्यंत निंदनीय असून महाविद्यालय व्यवस्थापन अशा कृत्याचे कधीही समर्थन करु शकत नाही, या प्रकाराचा आम्हीही निषेध नोंदविला असून दोषी असलेल्या प्राचार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी हिच आमची भूमिका आहे. नंतर घडलेला प्रकार हा महाविद्यालयात झालेला नाही, त्यामुळे महाविद्यालयाचे नाव नाहक गोवण्यात काहीच अर्थ नाही.
– डॉ.अशोक इथापे
(डॉ.वामनराव इथापे वैद्यकीय महाविद्यालय)

Visits: 13 Today: 1 Total: 116686

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *