बेकायदा वाळू तस्करीवरुन तापले संगमनेरातील राजकीय वातावरण! सामाजिक कार्यकर्त्याकडून गुन्हा दाखल; कथित वाळू तस्कराचा तक्रार अर्ज मात्र प्रलंबित


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने वाळू तस्करीच्या संशयावरुन गेल्या आठवड्यात एक वाहन रोखून धरले होते. याबाबत आपण प्रांताधिकार्‍यांकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने संगमनेरातील वाळू तस्करी मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर सदरची वाळू अधिकृतपणे कर भरुनच वाहतूक केली जात होती. मात्र संबंधित व्यक्तीने दारुच्या नशेत आपले वाहन अडवून चालकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करीत चालकाला मारहाण केल्याचा तक्रार अर्ज वाहनाच्या मालकाने दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांवरुन संगमनेरात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना आता संगमनेर तालुका पोलिसांनी ‘त्या’ सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रार अर्जावरुन दोघा निष्पन्न नावांसह अज्ञात असलेल्या 20 ते 25 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर वाहनचालकाने 31 ऑक्टोबर रोजी पोलीस उपअधीक्षकांना दिलेला तक्रार अर्ज मात्र आजही प्रलंबितच आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे यांनी घटनेच्या दिवशीच दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार ते गेल्या गुरुवारी (ता.27) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन निमज शिवारातील भोकनळ वस्तीच्या समोरील रस्त्याने घराच्या दिशेने जात असतांना पाठीमागून आलेल्या एका टीप्परवर (क्र.एम.एच.17/बी.वाय.7744) त्यांना संशय आला. याबाबत त्यांनी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांना मोबाईलवर संपर्क करुन माहिती दिली. त्यावर त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवतो, सदरील वाहन थांबवून ठेवण्यास त्यांना सांगितले. त्यावरुन वलवे यांनी सदरचा टिप्पर रोखण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व तो तसाच धांरफळच्या दिशेने वेगात निघून गेला.

त्यामुळे साहेबराव वलवे यांनी जवळपास सात ते आठ किलोमीटरपर्यंत त्या वाहनाचा पाठलाग करीत तालुका पोलीस निरीक्षकांना मोबाईलद्वारे या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने धांदरफळ ते मिर्झापूर रस्त्यावर सदरील टिप्पर रोखला. यावेळी त्यात भरलेल्या मालाची तपासणी केली असता त्यात वरच्या बाजूला कृत्रिम वाळूचा थर मारुन त्याखाली नदीपात्रातील वाळू भरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने मुदत संपलेल्या गौण खनिज वाहतुकीचा परवाना दाखवला. त्यावेळी वलवे यांनी वाहनचालकाला पोलीस व महसूलचे पथक तपासणीसाठी येत असून थोड्यावेळ वाहन उभे राहू देण्याची सूचना केली.

त्यानंतर 10 ते 15 मिनिटांतच अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे व सुहास पुंडे हे दोघे 20 ते 25 जणांसह घटनास्थळी आले. यावेळी या लोकांनी वलवे यांना; ‘तुम्हाला रस्त्यावर फिरावे लागते, गाठ आमच्याशी आहे.’ अशी धमकीही दिली. यावेळी वाकचौरे नामक इसम ‘तू कोण आहेस आम्हाला विचारणारा?’ असा सवाल विचारीत ‘मी वाळू धंद्यात पुंडे यांचा भागीदार आहे. आमच्याशी तडजोड कर, नाहीतर आम्ही पाहून घेवू’ असा दम देत रात्री साडेनऊच्या सुमारास तेथून वाळू भरलेला टिप्पर पळवून नेला. तेव्हापासून वरील दोघेजण आपल्या साथीदारांसह आपल्यावर पाळत ठेवत असून आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करुन ‘त्याला समजावून सांगा, नाहीतर त्याचा बेत बघू’ अशा धमक्या देत असल्याची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेण्यासाठी तालुका पोलिसांना तब्बल आठ दिवस लागले आणि त्यांनी बुधवारी (ता.2) दुपारी या प्रकरणी अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे व सुहास पुंडे या दोघांसह अज्ञात असलेल्या 20 ते 25 जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 143, 147, 149, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. तर गेल्या सोमवारी (ता.31) सदरील टिप्पर वाहनाचा मालक सुहास पुंडे यांनी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार घटनेच्या दिवशी दुपारी सव्वादोन वाजता त्यांनी पिंपळे येथील स्टोन क्रशरवरुन अधिकृत पावतीसह कृत्रिम वाळू भरली होती व ती घेवून ते ब्राह्मणवाड्याकडे जात होते. यावेळी खांडगाव शिवारातील पुलाजवळ साहेबराव वलवे यांनी त्यांचे वाहन अडवले.

यावेळी वलवे हे दारुच्या नशेत असल्याचा आरोप पुंडे यांनी केला व आपले वाहन आधी धांदरफळला व नंतर मिर्झापूर रस्त्यावर घेण्यास सांगितले. सदरील वाहनातील माल आपल्या हद्दीत खाली करावयाचा असल्यास आपणास 50 हजार द्यावे लागतील, नाहीतर माल खाली होवू देणार नाही. यावेळी त्यांच्यासोबत अन्य दोन इसमही होते असेही त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे. यावेळी 50 हजार रुपये द्या नाहीतर महसूलच्या अधिकार्‍यांना फोन करतो असा दमही वलवे यांनी भरला व दुपारी सव्वादोन वाजल्यापासून रात्री पावणेदहा वाजेपर्यंत आपले खासगी वाहन रोखून धरीत चालकाला लोखंडी रॉडने मारहाणही केली.

आपल्या वाहनातील कृत्रिम वाळू रीतसर कर भरुन त्याची वाहतूक केली जात होती. मात्र संबंधित इसमाने कोणतेही कारण नसताना नाहक आमचे वाहन उभे करुन पैशांसाठी आम्हाला त्रास दिला. यावेळी धांदरफळ व नंतर मिर्झापूर रस्त्यावर परिसरातील 50 ते 60 ग्रामस्थांनी त्यांना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते व एकसारखी आरेरावी करीत होते व आपल्यासोबत इतर लोकांनाही शिव्या देत होते. त्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी सुहास भाऊसाहेब पुंडे (रा.ढोकरी, ता.अकोले) यांनी तक्रार अर्जाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. साहेबराव वलवे भाजपाशी संबंधित व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्तुळातील असल्याचे मानले जात असल्याने या दोघांच्याही तक्रार अर्जावरुन तालुक्यात सध्या विविध चर्चांना उधाण आले असून राजकीय वातावरण तापले आहे.

Visits: 227 Today: 2 Total: 1099363

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *