साई संस्थानच्या तदर्थ समिती अध्यक्ष वेळच देत नाही ः विखे

साई संस्थानच्या तदर्थ समिती अध्यक्ष वेळच देत नाही ः विखे
… अन्यथा जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरण्याचा इशारा
नायक वृत्तसेवा, शिर्डी
नागरिक व कामगारांच्या प्रश्नी अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेवून ते बसत असलेल्या अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरणार असल्याचा इशारा माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे.


उच्च न्यायालयाने संस्थानचा अंतरिम कारभार पाहण्यासाठी तदर्थ समितीची नियुक्ती केली आहे. समितीचे अध्यक्ष इथे न्यायाधीश नाहीत तर संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांना कामगार व लोकप्रतिनिधींनाही भेटण्यास वेळ नसेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावे, असेही विखे म्हणाले. तदर्थ समितीच्या मनमानी काराभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी संस्थान कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. गुरूवारी ग्रामस्थ घंटानाद व महाआरती करतील. यानंतरही समितीच्या धोरणात फरक पडला नाही तर आपण कामगारांच्या बरोबर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचेही विखे यांनी जाहीर केले.


न्याय देण्यासाठी नेमलेली व्यवस्थाच अन्याय करीत असेल तर त्याविरोधात वरिष्ठ पातळीवर दाद मागावीच लागेल. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. कामगारांच्या बाबतीत जे निर्णय झालेले आहेत ते कायद्यानुसार व शासनाच्या मान्यतेने झाले आहेत. वेळोवेळी त्यास उच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे, असेही विखे शेवटी म्हणाले.

Visits: 84 Today: 1 Total: 1100508

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *