खांडगाव फाट्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू रस्ता दुभाजकावर कार आदळली; देवाचा मळ्यात शोककळा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील देवाचा मळा परिसरात राहणार्या मोहन बबन अभंग या पस्तीसवर्षीय तरुणाचा गुरुवारी अपघाती मृत्यू झाला. रात्री साडेदहाच्या सुमारास चंदनापुरीकडून संगमनेरच्या दिशेने येत असताना खांडगाव फाट्याजवळ त्याच्या चारचाकी वाहनाची रस्ता दुभाजकाला जोरदार धडक बसली. यावेळी वाहनाचा वेग अधिक असल्याने धडकल्यानंतर चालक मोहन अभंग स्टेअरिंगमध्ये फसला. आसपासच्या अन्य वाहनचालकांनी आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत त्याला वाहनाबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने तत्पूर्वीच त्याचे निधन झाले होते. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, मितभाषी आणि एकुलता एक असलेल्या मोहनच्या मृत्यूने देवाचा मळा परिसरात शोककळा पसरली आहे.
गुरुवारी (ता.15) देवाचा मळा येथे राहणारा व वाहन दुरुस्तीचे दुकान चालवणारा मोहन बबन अभंग (वय 35) काही कामानिमित्त चारचाकी वाहन घेवून (क्र.एम.एच.43/ए.एल.0997) पुणे-नाशिक महामार्गाने चंदनापुरीकडे गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास तेथून माघारी येत असताना त्याचे वाहन खांडगाव फाट्याजवळील प्रवरानदीच्या पुलावर असतांना समोरुन येणार्या वाहनाच्या प्रखर दिव्यांमुळे त्यांचा अंदाज चुकला आणि त्याचे वाहन रस्ता दुभाजकाला धडकले. यावेळी मोठा आवाज झाल्याने आसपाच्या नागरिकांसह रस्त्याने जाणार्या काही प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त वाहनाकडे धाव घेतली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे वाहनही घटनास्थळी पोहोचले.
अपघात झालेल्या वाहनात मोहन अभंग एकटाच होता. यावेळी नागरिक व पोलिसांनी मदतकार्य करीत त्याला वाहनाबाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारार्थ दाखल केले. मात्र दुर्दैवाने या अपघातात त्याला जबर मार लागल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाल्याने उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने अभंग कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. अतिशय शांत व संयमी स्वभाव, सगळ्यांशी गोड बोलणारा आणि निष्पाप असलेल्या मोहन अभंग याच्या संपर्कात येणारा प्रत्येकजण त्याचे कौतुक करीत. कष्टातून त्याने आपल्या वडीलांच्या प्रयत्नांना सतत साथ दिली. त्याचा अपघाती मृत्यू अनेकांना वेदना देणारा ठरला आहे. आज सकाळी पालिकेच्या शवविच्छेदनगृहात त्याची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर अकराच्या सुमारास त्याच्यावर संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माळी समाजातील नागरिकांसह देवाचा मळा व आसपासच्या नागरिकांची मोठी उपस्थिती होती.