पक्षाविरोधात काम केल्याचा राग ठेवून दोघांना मारहाण! घारगावमधील चौघांवर ‘अ‍ॅट्रोसिटी’; उपअधीक्षकांसमोर ‘वास्तव’ उघड करण्याचे आव्हान..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जावयाकडूनच सासर्‍याचा खून होण्याच्या जगावेगळ्या घटनेची चर्चा अद्यापही सुरु असताना तालुक्याचा पठारभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी घारगावमधील एका राजकीय नेत्याच्या समर्थकांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करीत दोघांना बेदम मारहाण केली असून दलित असलेल्या त्या दोघांही तरुणांना जातीवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास घारगावमधील चौघांवर मारहाण, दमदाटी व शिवीगाळ केल्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने घारगावसह संपूर्ण पठारभागात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गुन्हा दाखल झालेले चारही तरुण पठारावरील एका ‘वजनदार’ नेत्याचे समर्थक असल्याने या संपूर्ण प्रकरणातील वास्तव समोर आणण्याचे आव्हान पोलीस उपअधीक्षकांसमोर आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार बुधवारी (ता.२०) रात्री आठच्या सुमारास घारगावमध्ये घडला. याप्रकरणी मूळच्या पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्दचा मात्र हल्ली पठारभागातील आंबीखालसा येथे वास्तव्यास असलेल्या मुकेश संपत पवार या तरुणासह त्याचा मित्र किरण पांडुरंग लामखडे हे दोघे बोट्याकडून घारगावात येत असताना त्यांना घारगावात लोकांची गर्दी झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी उत्सुकतेपोटी काय झाले हे पाहण्यासाठी दुचाकी उभी करुन गर्दीत डोकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या दोघांना पाहून घारगावातील नीलेश अशोक आहेर, संकेत रमेश आहेर, विकास बाळू मते, अनिल बबन डोके असे चौघेजण आले व धक्काबुक्की करीत त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागले.

यावेळी ‘त्या’ चौघांनीही; ‘तुम्ही *** लई माजलेत, तुम्हाला खूप माज आला आहे?, तुम्ही येथे थांबायचे नाही. तुमचे सगळे *** घारगावमधून संपवून टाकू. तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात काम करतात काय’ असे म्हणत मुकेश पवार याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी नीलेश आहेर याने किरण लामखडेकडे जावून त्यालाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी किरण लामखडे चौघांनाही समजावून सांगत असताना, नीलेश आहेर याने ‘तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात काम करता काय?, तू लईच *** पोरांना एकत्र करुन आमच्या विरोधात काम करतोय का?’ असे म्हणत किरणची गचांडी पकडली. या गदारोळात त्याच्या गळ्यातील सोनसाखळी कोठेतरी पडून गहाळ झाली.

या प्रकाराने घाबरलेल्या किरण लामखडेने आपली सुटका करवून घेत तेथून पळ असता ‘त्या’ चौघांनीही त्याला पाठलाग करुन पकडले व पुन्हा लाथाबुक्यांनी मारहाण करु लागले. त्याला सोडवण्यासाठी फिर्यादी मध्यात गेला असता मारहाण करणार्‍या त्या चारही तरुणांनी पुन्हा ‘ए *** तू मध्ये येवू नकोस, तुम्ही किती ** आहात तेच बघतो, तुमच्या सोबत सगळ्या *** इथून मारहाण करुन काढून देईल’ अशी धमकी भरली. यावेळी वरील चौघांनीही आपण अनुसूचित जाती-जमातीमधील असल्याचे माहिती असतानाही आपणासह आपल्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली, या गदारोळात किरण लामखडे याच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली अशा आशयाच्या फिर्यादीवरुन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२३, ५०४, ५०६ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अ‍ॅट्रोसिटी) कलम ३ (१), (५), (आर) प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पठारावरील लळई घाटात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या खुनाचा उलगडा केला होता. त्या प्रकरणात खुद्द जावयानेच आपल्या सासर्‍याचा गळा आवळून व नंतर स्क्रू-ड्रायव्हरने त्याच्या गळ्यावर वार करुन खून केला व मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मयताचे कपडे काढून त्यावर पेट्रोल टाकून त्याचा चेहरा जाळून तो विद्रूप करुन पुरावा नष्ट केल्याचे तपासातून समोर आले होते. शुक्रवारी (ता.१५) रात्री घडलेल्या या घटनेची दोन दिवसांत पोलिसांनी उकल करीत मयताचा जावई आणि साडूसह त्याच्या मेव्हणीला गजाआड करीत चक्रावणार्‍या या प्रकरणाला वाचा फोडली. त्याची अद्यापही चर्चा सुरु असतानाच आता घारगावात ‘अ‍ॅट्रोसिटी’चा प्रकार घडल्याची तक्रार दाखल झाल्याने थंडीच्या अंमलात शिकोट्यांचा आधार घेत पठारावरील समूह चर्चासत्रात वाढ झाली आहे.

बुधवारी रात्री आठच्या सुमारास घारगावमध्ये घडलेल्या या प्रकरणात नेमके काय घडले? याचा शोध घेवून वरील प्रकरणातील फिर्यादीसह त्याच्या मित्राला मारहाण करण्यामागील कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरुणांच्या दोन गटात होतात त्याप्रमाणेच सदरील भांडणे होती, मात्र त्याला वेगळे स्वरुप दिले जात असल्याचे सांगणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे दाखल झालेला गुन्हा प्राथमिक तपासावर असताना पोलिसांना आसपासच्या सीसीटीव्ही फूटेजसह प्रत्यक्षदर्शीचाही माग काढावा लागणार आहे. एकंदरीत या प्रकरणात राजकीय कारणावरुन मारहाण झाल्याचा उल्लेख झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून वास्तव समोर आणण्याचे दिव्य पोलिसांना पेलावे लागणार आहे.

Visits: 25 Today: 1 Total: 117832

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *