पोहेगाव येथील एटीएम फोडून अकरा लाख लांबवले सहा महिन्यांपूर्वी देखील चोरट्यांनी मारला होता डल्ला

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी एटीएममधील १० लाख ८३ हजार ७०० रुपयांची रोकड लांबविली. सहा महिन्यांपूर्वी हेच एटीएम चोरट्यांनी तोडले होते. ही घटना मंगळवारी (ता.१९) पहाटे २ वाजून ४८ मिनिटांनी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की ओव्हरसीज बँकेशेजारी असलेले जय भद्रा फिटनेस क्लबचे व्यवस्थापक राजेंद्र रोहमारे व बाबासाहेब घेर हे क्लब सुरू करण्यासाठी पहाटे आल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ बँकेचे व्यवस्थापक बी. डी. कोरडे, बाबासाहेब खंडीझोड यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. बँकेचे व्यवस्थापक व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ व पथक पोहेगावात दाखल झाले. एटीएम तोडलेल्या घटनेची बारीकसारीक माहिती पोलिसांनी घेतली. अशाच पद्धतीने तळेगाव येथील याच बँकेचे एटीएम चोरट्यांनी रात्रीच फोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सकाळी नऊ वाजता श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
