संगमनेरातील बेकायदा उद्योगांवरील कारवाईसाठी पोलिसांची एकमेकांशी स्पर्धा! न भूतो, न भविष्यती; विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अप्पर अधीक्षक आणि स्थानिक पोलिसांचे एका मागोमाग छापासत्र..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुसंस्कृतपणाची शेखी मिरवणार्‍या संगमनेर शहरात आज एक अनोखी आणि नवलाईची गोष्ट घडली. मुख्यमंत्र्यांपासून वरीष्ठांपर्यंत झालेल्या एका तक्रारीची नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दखल घेत कारवाईसाठी आज आपले पथक रवाना केले. ही माहिती मिळताच श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षकांचे पथकही संगमनेरच्या दिशेने रवाना झाले. या दोन्ही पथकांची माहिती मिळताच हा फास आपल्याच गळ्याभोवती आवळणार म्हंटल्यावर ही पथके पोहोचण्यापूर्वीच शहर पोलिसांनीही छापासत्र सुरु केले. भूतकाळात कधीही न घडलेला, आणि कदाचित यानंतर कधी घडेल याची शक्यता नसलेला हा प्रकार वरकरणी पोलिसांची कारवाईसाठी लगबग दाखवणारा असला तरी यामागे मोठे गौडबंगाल आहे हे मात्र खरे. या कारवाईच्या चर्चा मात्र संगमनेरातील कट्ट्याकट्ट्यावर अगदी खुमासदारपणे सुरु आहेत.


जिल्ह्यात सुसंस्कृतपणाची शेखी मिरवणार्‍या संगमनेरात अवैध धंदे आणि ते चालवणार्‍यांचीही शहराच्या ‘समृद्धी’ इतकीच गर्दी आहे. या धंद्यांना पोलिसांचे आर्थिक पाठबळ आहेच हे सांगण्यासाठीही कोणा तज्ज्ञांची गरज नाही. पण सगळंकाही आलबेलं असल्याने तेरी भी चूप, और मेरी भी.. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरु आहे. या अवैध व्यवसायांमुळे संगमनेरच्या संस्कृतीची पुरती वाट लागलेली असतांनाही त्यांना मिळालेला राजाश्रय पाहता त्या विरोधात बोलण्याचे धारिष्ट्य कोणातही नाही अशी सध्याची संगमनेर शहराची अवस्था आहे.


आता एकाचा चालू आणि दुसर्‍याचा बंद म्हंटल्यावर पोटदुखी होणं स्वाभाविकच. त्यातूनच एकाने शहरातील वाढत्या अवैध धंद्यांबाबत थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष महानिरीक्षकांपर्यंत अनेकांकडे लेखी तक्रारी केल्या. त्याची दखल घेवून म्हणा, किंवा हे आम्हाला कसे माहिती नाही या विचारातून म्हणा पण या तक्रारीची दखल घेतली गेली. संगमनेर शहरातील आपणास माहित नसलेल्या अशाच धंद्यांना खणत्या लावण्यासाठी सर्वप्रथम नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आपले ‘विशेष पथक’ संगमनेरच्या दिशेने धाडले. त्यांची कूच होताच बातमी मात्र फुटली आणि संगमनेरपासून ते थेट श्रीरामपूरपर्यंतची कार्यालये लागलीच कर्तव्याला जागली.


विशेष पोलीस निरीक्षकांचे विशेष पथक संगमनेरात पोहोचण्यापूर्वीच कर्तव्यदक्ष संगगमनेर पोलिसांनी विषेश पथकाचा रोख मटक्याच्या दिशेनेच असेल असे गृहीत धरुन शहरातील तेलीखुंट, नेहरु चौक, कासट संकुल, कुरण रोड व अकोले बायपास रस्त्यावरील मटका पेढ्यांवर छापे घातले. तोवर ही माहिती श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातही जावून धडकली होती. कारवाईचे बालंट आपल्याकडे नको म्हणून या कार्यालयाचेही एक पथक घाईघाईने संगमनेरच्या दिशेने रवाना झाले. मात्र दुर्दैवाने त्यांना 50 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अधिक वेळ लागल्याने तोपर्यंत विशेष पथक संगमनेरात पोहोचले आणि येताच त्यांनी केसेकर संकुलातील मटका पेढीवर छापा घातला.


सदरची कारवाई सुरु असतांनाच श्रीरामपूरचे पथकही संगमनेरात हजर झाले. यावेळी विशेष पथक शहराच्या उत्तरेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या विरुद्ध दिशेने शहराच्या दक्षिण कोपर्‍यात असलेल्या देवीगल्लीत धाव घेत झुंजूरवाड्यातील जुगार्‍यांना जेरबंद केले. एकाच दिवशी, अचानक नाशिक आणि श्रीरामपूरसह स्थानिक पोलिसांनी एकामागून एक छापे घातल्याने शहरात मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण आले. या तिनही पथकांनी एकूण सात ठिकाणी छापे घातले, त्यात एका जुगार अड्ड्यासह उर्वरीत कारवाया मटका पेढ्यांवर झाल्या.


आता विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने ‘त्या’ पत्राची दखल म्हणून कारवाई केली की आम्हाला कसे माहिती नाही या विचाराने हा संशोधनाचा मुद्दा आहे. मात्र विशेष महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने संगमनेरात येवून अवैध धंद्यावरील कारवायातून आपल्या गळ्याला फास लावू नये म्हणून श्रीरामपूरच्या आणि स्थानिक पोलिसांनी कारवाईसाठी केलेली धावपळ मात्र संगमनेरकरांच्या चर्चांचे कारण ठरली. सध्या यासर्व छाप्यांमधून झालेल्या कारवाया नोंदविण्याचे काम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *