कोपरगावमध्ये नोकराकडून मालकाचा विश्वासघात! दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मालकाचा विश्वासघात करुन नोकराने तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटना कोपरगाव शहरातील कालेमला येथे शुक्रवारी (ता.८) सकाळी ८ ते रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत गुरुवारी (ता.१४) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की व्यापारी रतेश मदनलाल बडजाते यांच्याकडे संजयनगर येथील संशयित आरोपी रुपेश सुनील कोपरे हा कामास आहे. त्याने मालक बडजाते यांचा विश्वासघात करुन घरातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली, ४ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कानातील सुई दोरा, ४५ हजार रुपये किमतीच्या पाच सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे.

याप्रकरणी व्यापारी रतेश बडजाते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रुपेश कोपरे याच्यावर गुरनं. ५६१/२०२३ भादंवि कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ए. एम. दारकुंडे हे करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नोकरानेच मालकाचा विश्वासघात करुन सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने त्याची चर्चा होत आहे.

Visits: 231 Today: 1 Total: 2122320

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *