संगमनेरातून सोनसाखळ्या लांबवणारा चोरटा पकडला! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोठ्या कालावधीनंतर महिलांसाठी समाधानकारक वृत्त..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दशकभरापासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुचाकीवरुन येवून महिलांचे दागिने ओरबाडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र अशा घटनांच्या तपासात पोलिसांच्या कामगिरीचा आलेख कायमच जमीनीवर राहील्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काहीअंशी ते निवळण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून महिन्याभरापूर्वी मेहेरमळा भागातून 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी लांबवणार्‍या चोरट्याला अहमदनगरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यातील महिला वर्गाला काहीसा दिलासा मिळाला असला तरीही अटक केलेल्या आरोपीने केवळ संगमनेर व राहाता येथील प्रत्येकी एकाच चोरीत सहभाग असल्याचे चौकशीत सांगितले. तर त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात चोरीचे सोने घेणार्‍या राहाता तालुक्यातील सराफालाही ताब्यात घेवून संगमनेर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.


याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने प्रसिद्धपत्रक जारी केले आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात 20 नोव्हेंबररोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संगमनेर शहरातील मेहेरमळा परिसरात सदरची घटना घडली होती. मूळच्या पुणे जिल्ह्यातील मात्र हल्ली संगमनेरातच वास्तव्यास असलेल्या उषा अशोक लोंगाणी (वय 65 वर्ष) या आपल्या नातवाला घेवून जात असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली होती. या घटनेनंतर संगमनेरातील महिलांची सुरक्षा ऐरणीवर आलेली असतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.


त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, संतोष लोंढे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संदीप चव्हाण, गणेश भिंगारदिवे, संतोष खैरे, पोलीस शिपाई रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चालक अरुण मोरे यांचे पथक करुन त्यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी घटना घडल्याच्या आधीपासून परिसरासह मेहेरमळ्यातून मुख्यमार्गाकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्हींमधून लोंगाणी यांच्या गळ्यातून सोनसाखळी लांबविणार्‍या सचिन ताके या आरोपीची ओळख पटवली.


त्याचा शोध सुरु असतांनाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबर्‍यामार्फत आरोपी लाला रंगाच्या विनाक्रमांकाच्या पल्सरवरुन श्रीगोंदा रोडवरुन अहमदनगरमधील चाँदणी चौकात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या वरील पथकाला आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने चाँदणी चौकात सापळा रचला असता मिळालेल्या वर्णनाचे वाहन दृष्टीस पडताच त्याला थांबण्याची सूचना केली. यावेळी पाठीमागील इसम खाली उतरताच दुचाकी चालकाने वाहनाचा वेग वाढवला व तो पसार झाला.


यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपीला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव सचिन लक्ष्मण ताके (वय 33, रा.उंदीरगाव, ता.श्रीरामपूर) तर, पळून गेलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी (रा.श्रीरामपूर) असल्याचे सांगितले. त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेवून अधिक चौकशी करता त्याने संगमनेर येथील लोंगाणी यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्यासह राहाता येथील एका प्रकरणाची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडील चौकशीत त्याने सदरील सोने राहाता तालुक्यातील रुई येथील विजय पोपट उदावंत या सोनाराला विल्याचे सांगितले व आपल्या जवळील 4 हजार 500 रुपये मुद्देमालाच्या विक्रीतील असल्याची माहिती दिली.


त्यावरुन पोलिसांनी रुई येथे जावून विजय उदावंत या सराफालाही ताब्यात घेतले असून दोघांनाही संगमनेर शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत ताब्यात घेतलेल्या श्रीरामपूरच्या सचिन लक्ष्मण ताके याच्या विरोधात अलिकडच्या काळात संगमनेर व राहाता येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यासह यापूर्वी अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मिळून एकूण 29 गुन्हे दाखल असून त्यातील चार गुन्हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील आहेत.


मोठ्या कालावधीनंतर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्यार्‍या टोळीतील एकाला अटक करण्यात यश आल्याने आपल्याही गुन्ह्याचा तपास लागून चोरीला गेलेले दागिने परत मिळतील अशी आशा महिलांच्या मनात निर्माण झाली आहे, मात्र तशी शक्यता फारच दुर्मिळ असल्याचे यापूर्वीच्या अशा घटनांमधून स्पष्ट असल्याने सदर प्रकरणाचा तपास या प्रकरणावरच संपण्याची शक्यता आहे.

Visits: 18 Today: 2 Total: 118184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *