मृत्यूपूर्वीही ‘कूकर्म’च करुन गेला क्रूरकर्मा! सुगाव प्रकरण; अल्पवयीन मुलीला दरवाजा तोडून फरफटले..


नायक वृत्तसेवा, अकोले
रविवारी सायंकाळी सुगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी केलेल्या बेदम मारहाणीत चार महिलांच्या खुनाचा आरोप झालेला क्रूरकर्मा अण्णा पांडुरंग वैद्य (वय ५८) मृत्यूमुखी पडला. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवणार्‍या या घटनेची पार्श्वभूमी मात्र प्रचंड धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. त्यातून अत्यंत निर्दयीपणाने महिलांचं मुडदे पाडणार्‍या सुगावच्या या क्रूरकर्म्याने मरण्यापूर्वीही कूकर्मच करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री अत्यवस्थ अवस्थेत त्याला संगमनेरच्या दिशेने आणले जात असतानाच तिकडे अकोले पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनाधिकाराने घरात घुसून पीडितेचा विनयभंग करण्यासह तिला मारहाण, शिवीगाळ, धमक्या दिल्यावरुन भारतीय दंडसंहितेसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायदा (पोक्सो) आणि मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातून सुगावमधील ग्रामस्थ इतके संतप्त का झाले असावेत याचेही चित्र स्पष्टपणे उभे राहिले आहे.

रविवारी (ता.१०) सायंकाळी पाचच्या सुमारास सुगावमध्ये राहणारा क्रूरकर्मा अण्णा वैद्य याला जमावाने बेदम मारहाण केल्याच्या दूरध्वनीवरुन आरोग्य सेवेची १०८ रुग्णवाहिका सुगावमध्ये दाखल झाली. तेथून अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या वैद्य याला अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची अवस्था गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला संगमनेरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वैद्यच्या मुलाने त्याला संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात आणले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वृत्ताने गुन्हेगारी जगतासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली, मात्र जमावाने त्याला इतकी मारहाण का केली? याबाबत प्रश्नचिन्ह असताना अकोले पोलीस ठाण्यात त्याचवेळी गुन्हा दाखल झाला आहे.

त्यानुसार गावातील बारावर्षीय पीडित मुलगी रविवारी (ता.१०) दुपारी एकच्या सुमारास आपल्या मैत्रिणीकडे जात होती. त्यावेळी रस्त्यात घर असलेला क्रूरकर्मा अण्णा वैद्य हा दारातच उभा होती. यावेळी त्याने समोरुन जाणार्‍या त्या चिमुरडीला ‘ए पोरी इकडे ये..’ असे म्हणत दरडावले. त्यामुळे ती कोवळी मुलगी भयभीत होवून सुसाट उलट्या पावली आपल्या घराकडे धावली, मात्र उद्विग्न झालेल्या अण्णा वैद्यने तिचा पिच्छा सोडला नाही. त्याने तिचा पाठलाग केला, त्यामुळे घारबलेल्या त्या चिमुरडीने आतून घराची कडी लावली. मात्र आरोपीने तिच्या घराच्या दारावर लाथा घालून ते तोडले आणि त्या मुलीचे केस धरुन तिला ओढीतच घराबाहेर आणून आपटले. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात लाथ मारली.

एका हाताने मारहाण तर दुसर्‍या हाताने केस धरुन ओढीतच तो तिला त्याच्या घराकडे घेवून चालला. या दरम्यान तो तिला लाथाबुक्यांनी मारहाण करीत होता. रस्त्यातील एका खांबावर डोके आपटून त्याने तिला मारण्याचाही प्रयत्न केला. प्रचंड मारहाणीमुळे ती इवलीशी मुलगी जोरजोराने ओरडत, विव्हळत होती. मात्र त्या क्रूरकर्माच्या दहशतीसमोर कोणी उभं राहायला तयार नव्हतं, अशावेळी एक महिला धाडस करुन पीडितेच्या मदतीला धावली. मात्र त्याने तिलाही ‘जर पुढे आलीस, तर तंगडं धरुन आपटील..’ अशी धमकी भरल्याने ती थबकली, मात्र त्या महिलेने आरडाओरड करीत इतर लोकांनाही जागे करण्याचा प्रयत्न केला.

या गदारोळात गावातील दोन तरुणी त्या मुलीच्या मदतीला आल्या पण त्यांनाही त्याने दाद दिली नाही. उलट ‘तुम्ही येथून निघून जा, नाहीतर लाथा घालीन..’ असा दम भरल्याने त्या घाबरुन पळून गेल्या. त्यानंतर त्याने पीडितेला मारत त्याच्या घरापर्यंत ओढीत नेले. त्यावेळी तो पीडितेला म्हणाला; ‘ए पोरी, तुला घराकडे बोलावलं तर आली का नाही. थांब तुला फाशी देतो अन् तुला लाकडाला बांधून नदीत फेकून देतो..’ असे म्हणतं त्याने अवघ्या बारा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला. तोपर्यंत अण्णा वैद्य नावाच्या त्या क्रूरकर्माचे कूकर्म गावभर पसरल्याने अनेकजण त्याच्या घराकडे धावले.

यावेळी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करणार्‍या एका कर्मचार्‍याने त्याला मुलीला सोडून देण्यास सांगत धक्का मारुन त्याच्या तावडीतून मुलीला सोडवले. इतर महिलांनी लागलीच जखमी झालेल्या त्या चिमुरीडीला तेथून घरी व नंतर तिच्या आई-वडिलांच्या मदतीने अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी उशिराने अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी अण्णा पांडुरंग वैद्य (वय ५८, रा.सुगाव) याच्यावर भारतीय दंडसंहितेचे कलम ३५४, ३५४ (ड), ४५२, ३२३, ५०६, ४२७ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम ८, १२ व मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमाच्या कलम ७५, ८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


आरोपी अण्णा वैद्य याच्या विरोधात काल रात्री अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. आरोपीला संगमनेर येथे उपचारासाठी नेले होते. मात्र उपाचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. अण्णा वैद्य याच्यावर यापूर्वीही महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातही तसाच गुन्हा दाखल झाला असून दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
– सोमनाथ वाघचौरे
(उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर)

Visits: 2 Today: 1 Total: 27323

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *