क्रूरकर्मा अण्णा वैद्यचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू! अल्पवयीन मुलीची छेडछाड; संतप्त जमावाने लाथाबुक्यांनी केली प्रचंड मारहाण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेक महिलांचे मुडदे पाडून त्यांचे शव आपल्याच शेतात पुरुन ठेवणाऱ्या व सदोष पुराव्या अभावी न्यायालयातून निर्दोष मुक्तता झालेल्या सुगाव महिला हत्याकांडातील क्रूरकर्मा अण्णा वैद्य याचा आज सायंकाळी जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. सुगाव खुर्द येथे घडलेल्या या घटनेत आरोपी वैद्य याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचे समोर आले आहे. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली, त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आला आहे.
याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज (ता.10) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे घडली. या घटनेत काही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात गाजलेल्या सुगाव महिला हत्याकांडातील मुख्य आरोपी मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य (वय 58, रा. सुगाव खुर्द, ता. अकोले) याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
तेव्हापासून तो सुगाव खुर्द मध्येच राहत होता. आज (ता.10) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या गोष्टीवरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्रित होऊन त्याला बेदम मारहाण केली. अर्धमेल्या अवस्थेत 108 रुग्णवाहिकेतून सुरुवातीला त्याला अकोले ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल व त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Visits: 39 Today: 1 Total: 114991