संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यांवर ‘एलसीबी’चा छापा! एकाच कारवाईत पहिल्यांदाच आठ आरोपी; सहाशे किलो गोमांसही हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या राज्यात संगमनेरच्या नावाला बट्टा लावणार्‍या गोवंश कत्तलखान्यांमध्ये सुरु असलेल्या कत्तली आजही अव्याहत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने भल्या सकाळीच कारवाईचा बडगा उचलला असून कसाईवाडा परिसरात घातलेल्या छाप्यात सहाशे किलो गोवंशाच्या मांसासह एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच छाप्यात पहिल्यांदाच तब्बल आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना पाठलाग करुन पकडण्यात आले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.6) सकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांना आपापल्या विभागातील अवैध व्यवसाय उध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन अडबल, पोलीस शिपाई आकाश काळे, मच्छिंंद्र बर्डे व अमृत आढाव यांच्या पथकाने मंगळवारी रात्रीपासून तालुक्यात कोठे अवेध प्रकार सुरु आहेत का याची चाचपणी सुरु केली असता आज भल्या सकाळी शहरालगतच्या कसाईवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली.


त्यानुसार संगमनेर उपविभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना त्याबाबतची माहिती देत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बकर कसाब मशिदीजवळील परिसरात छापा घातला. सकाळीच पोलिसांना आपल्या दिशेने येताना पाहुन कसायांची एकच धावपळ उडाली, त्यात कत्तल करणार्‍या सगळ्याच कसायांनी हातातील सुरे फेकून देत तेथून धूम ठोकली. मात्र एलसीबीच्या पथकाने पाठलाग करीत त्यातील दोघांना पकडले. यावेळी या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांस गोळा करुन ठेवल्याचे दिसून आल्यानंतर पथकाने ते जप्त करुन त्याची कायदेशीर विल्हेवाट लावली.


पथकाच्या हाती लागलेल्या शफिक महंमद कुरेशी (वय 32, गल्ली नं.9, जमजम कॉलनी) व शहबाज गुलफाम कुरेशी (वय 32, रा.मोगलपूरा) यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी पळून गेलेल्या मुजाहित उर्फ मुज्जू दौला कुरेशी, हारुण सुल्तान कुरेशी, कलीम जलील कुरेशी, शाहीद इशाद कुरेशी, उमर शकूर कुरेशी व खलील बुढण कुरेशी (सर्व रा.मोगलपूरा) यांची नावे उलगडली. या प्रकरणी पो.ना.सचिन अडबल यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील आठ जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 269 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने संगमनेरातील गोवंश कत्तलखाने आजही अव्याहतपणे सुरुच असल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Visits: 235 Today: 4 Total: 1105982

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *