अज्ञात वाहनातून संगमनेरात पाडला गेला पैशांचा पाऊस! नोटा गोळा करण्यासाठी तोबा गर्दी; संगमनेर पोलिसांना मात्र घटनेची खबरच नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून चर्चेत असलेल्या संगमनेरात आता आणखी एका विचित्र घटनेची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारी नाशिकच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या एका कारमधून चक्क पाचशे रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या. एरव्ही महामार्गावर वाहनांची दाटी पाहणार्यांना जेव्हा वाहनांच्या जागी चक्क पाचशे रुपयांच्या नोटा वाहताना दिसल्या. तेव्हा अनेकांनी रस्त्यावर नोटा वेचण्यासाठी गर्दी केली, हा प्रकार पाहणार्या दुचाकीस्वारांनाही पैशांचा ‘मोह’ आवरता न आल्याने काही मिनिटांसाठी मालपाणी लॉन्स आणि शेतकी संघ पेट्रोल पंप या महामार्गावरील दोन्ही लेन स्तब्ध झाल्या होत्या. पैशांचा पाऊस पडावा तशा नोटाच नोटा बरसल्याने शेकडो नागरिकांनी मिळतील तेवढ्या खिशात भरुन तेथून काढता पाय घेतला. जवळपास अर्धातास शेकडो नागरीकांच्या गर्दीत घडलेल्या या खळबळजनक प्रकारची खबर मात्र शहर पोलिसांना लागली नाही हे विशेष.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी (ता.४) दुपारी सव्वाचारच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील शेतकी संघाच्या पेट्रोल पंपासमोर घडला. दुपारच्यावेळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु असताना बाजार समितीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एका लाल रंगाच्या कारमधून शेतकी संघासमोर अचानक पाचशे रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या. सायंकाळच्या वेळी या परिसरात अधिक गर्दी असते. शाळा, महाविद्यालये सुटण्याची वेळ असल्याने अनेक विद्यार्थी व पालकांचा वावर असतो. विविध कृषी व सहकारी संस्थाही याच परिसरात असल्याने कॉलेज रोड म्हणजे नेहमीच ओसंडलेला रस्ता समजला जातो.
त्यामुळे रस्त्यावर चक्क पाचशे रुपयांच्या नोटा उडताना पाहून रस्त्याने जाणार्या सर्वच वयोगटातील नागरिकांनी देहभान विसरुन आणि महामार्गावरील वाहनांकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावरील पैसे वेचण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहनांचा खोळंबा झाला खरा, मात्र याचा फायदा घेत काही चारचाकी, रिक्षा व दुचाकीस्वारांनीही आपली वाहने भररस्त्यात उभी करुन हाती येतील तितके गोळा करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केवळ शेतकी संघासमोरील बाजूने नाशिककडे जाणार्या रस्त्यावरच नव्हेतर तर त्याच्या दुसर्या बाजूला मालपाणी लॉन्ससमोरही घडत होता. इकडच्या लेनमध्ये पैसे उडताना पाहून अनेक बहाद्दरांनी तिकडच्या लेनमध्ये आहे त्याच ठिकाणी आपली वाहनं उभे करुन इकडच्या बाजूला उड्या घेतल्या. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली.
ज्याला मिळाले तो परत जायला नको म्हणून लागलीच तेथून पसार झाला. मात्र ज्यांना काहीच मिळाले नाही ते मात्र तेथेच चर्चा करीत थांबल्याने उत्सुकतेपोटी कान देणार्यांची बराच वेळ गर्दी होत होती. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होत होता. मात्र जवळपास अर्धातास इतका मोठा तमाशा होवूनही शहर पोलिसांना त्याची साधी भणकही लागली नाही. काही वेळानंतर उधळलेल्या नोटा नकली असल्याचीही चर्चा समोर आली आहे. पोलीस तपासानंतरच त्याचे वास्तव समोर येईल. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून माहिती संकलित केली जात आहे. या प्रकाराची संगमनेर शहरात जोरदार चर्चा असून नाशिकरोडला पैशांचा पाऊस पडल्याचे खमंगपणे सांगितले जात आहे.
सोमवारी अज्ञात वाहनातून संगमनेरात पाचशे रुपयांच्या नोटा उधळल्या गेल्या. सदरचा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. मात्र आता ‘त्या’ नोटा नकली असल्याची चर्चा सुरु आहे. उधळण्यात आलेल्या नोटा किती रकमेच्या होत्या याबाबतही नेमकी माहिती नाही. त्यामुळे नकली असल्यातरीही हुबेहूब भासणार्या या नोटांमधून व्यापार्यांची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेवून त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. अन्यथा येऽ रेऽ माझ्या मागल्याऽ प्रमाणे हा एक अध्याय लिहिला जाईल.