वंचितांना सुविधा दिल्याने नक्षलवादाला थारा मिळाला नाही ः डॉ. कोल्हे कोल्हे दाम्पत्यांच्या अनुभव कथनातून उलगडले अपरिचित मेळघाटाचे स्वरुप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही मेळघाटातील अनेक ठिकाणे मुलभूत मानवी सुविधांपासून वंचित आहेत. मायबाप सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत. याच भागातील अतिदुर्गम बैरागड परिसरातील आदिवासी बांधवांसाठी निस्वार्थ भावनेतून डॉ. रवींद्र कोल्हे व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याने १९८४ सालापासून वैद्यकीय सुविधा पुरवताना तेथे राबवलेल्या विविध उपक्रमांतून आदिवासींच्या आयुष्यात आशेचा किरण उगवला. या वंचितांना सुविधा पुरवल्याने या भागात नक्षलवादाला थारा मिळाला नसल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केले.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर युवा आमदार सत्यजीत तांबे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, सीए. नारायण कलंत्री, अनिल राठी, जसपाल डंग, अ‍ॅड. ज्योती मालपाणी, स्मिता गुणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रदीप मालपाणी यांनी केले.

अध्यक्षस्थानाहून बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, मोबाईलचे जनजीवनावर अतिक्रमण झाल्याने, रिल्समधून डोके वर काढायला लोकांना सवड नाही, अशा अवस्थेत व्याख्यानमालेला मिळणारा प्रतिसाद संगमनेरकरांच्या रसिकतेचा प्रत्यय देतो. मी पहिल्या वर्षापासून या व्याख्यानमालेचा एक घटक आहे. आजही कोल्हे दाम्पत्याला ऐकण्यासाठी मुंबईहून धावपळ करीत आलो. या व्याख्यानमालेमुळे राज्यभरातील अनेक मोठ्या माणसांचे संगमनेरशी एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. दिवंगत प्रकाश बर्डे यांच्या आठवणींना उजाळा देतानाच, या उपक्रमात उत्साही संयोजकांनी नवीन पिढीला समावून घेणे आवश्यक असल्याचे थोरात म्हणाले. आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या ४६ वर्षांपासून व्याख्यानमालेचे शिवधनुष्य पेलणार्‍या संयोजकांचे कौतुक केले.

खास नागपूरी भाषेत सहजतेने साधलेल्या डॉ. स्मिता कोल्हे यांच्या खुसखुशीत विनोदी शैलीतील संवादाने उपस्थितांची हसून पुरे वाट लागली. मेळघाटातील आदिवासींचे रोजचे जगण्याचे प्रश्न, त्यासंबंधीची आस्था हे सारे आपल्याही जगण्याचा भाग करीत, कोल्हे दाम्पत्याने मेळघाटाला कर्मभूमी मानले. निस्वार्थ समाजसेवेचा, महात्मा गांधींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याचा व खर्‍याअर्थाने रुग्णसेवा करण्याचा वसा घेतलेल्या या दाम्पत्याचे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकताना धन्य झाल्याची भावना संगमनेरकरांच्या मनात रुजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *