संगमनेरातील खासगी डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण विभागासमोर रांगा! सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्या तक्रारी; कोविड संक्रमणाचीही भीती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुख्यालयासह अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेतील बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेचा फटका बसल्याचे दिसत असतांना संगमनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला आहे. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील रुग्णसंख्येने रोज नवा उच्चांक गाठतांना जिल्ह्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेगही साडेपाचशे आसपास पोहोचवला आहे. संगमनेरातील रुग्णगती मात्र अजूनही नगण्य असून तालुक्यातून दररोज सरासरी अवघे सोळा रुग्ण समोर येत आहेत. संगमनेरातील खासगी डॉक्टरांची संख्या आणि लसीकरणामुळे सुरक्षित झालेले जीवन यामुळे नागरिक कोविडसदृश्य लक्षणे असतानाही चाचणी न करताच बाह्यरुग्ण विभागांचा आधार घेत आहेत. यातून केवळ परिस्थिती गंभीर झालेले अथवा खासगी डॉक्टरांच्या सूचनेवरुन आलेले रुग्णच स्राव चाचणी करीत असल्याने तालुक्यात संक्रमण गतिशील असूनही प्रत्यक्ष कोविड रुग्णांची संख्या मात्र जेमतेम आहे.
गेल्या पाच जानेवारीपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यातील कोविड बाधितांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण जिल्ह्यातून दररोज सरासरी 54 रुग्ण समोर येत होते, त्यात गेल्या अठरा दिवसांतच जवळपास दहापटीने वाढ झाली असून जिल्ह्याचा दैनिक रुग्ण समोर येण्याचा आजचा वेग 581 रुग्ण इतका मोठा आहे. यावरुन जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची गती लक्षात येते. मात्र त्याचवेळी संक्रमणाच्या दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात जायबंदी झालेल्या संगमनेर तालुक्यात मात्र संक्रमणाच्या तिसर्या लाटेतील रुग्णसंख्या विचार करायला लावणारी आहे. जिल्हाधिकार्यांनी आढावा बैठकांमध्ये चाचण्यांचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र रुग्ण चाचणी केंद्रावर येतच नसेल तर काय करावे? असा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर आहे.
अर्थात केंद्र व राज्य सरकारांनीही कोविडचा धोका मोठा नसल्याने नियमित उपायांच्या पालनाशिवाय अन्य निर्बंधांची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. सोमवारपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरु होत आहेत. संगमनेर तालुक्यात लसीकरणाचा पहिला डोस विक्रमी लाभार्थ्यांना दिला गेला आहे. दुसरा डोसही पन्नास टक्के लाभार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जीवितास हानी नसल्याचा आत्मविश्वासही या लाटेत नागरिकांच्या मनात दिसून येतो. पूर्वी सर्दी झाली अथवा खोकला आला तरीही माणसं घाबरुन जात होती, एखादा शिंकला तर ते पाहून अनेकजण अस्वस्थ होत होते. मात्र तो आता इतिहास झाला आहे.
सध्या संगमनेर शहरातील खासगी क्लिनिकबाहेर सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी अशा तक्रारी घेवून आलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. वातावरणात झालेले विचित्र बदल आणि त्यातून अनुभवायला मिळालेले विविध ऋतू याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाल्याने अशा तक्रारी वाढल्या आहेत. मात्र त्याचवेळी कोविड संक्रमणाचा संसर्गही झपाट्याने वाढल्याने अशा रुग्णांमध्ये बाधित व्यक्तिंचाही मोठा भरणा आहे. मात्र वरील सकारात्मक गोष्टींमुळे कोविडचे भयच नाहीसे झाल्याने आपल्या नियमित डॉक्टरांवर भरवसा ठेवून रुग्ण तीन दिवसांचा डोस घेत गृहविलगीकरणातूनच बरा होत आहे. त्यामुळे अनेकजण चाचण्याच करीत नसल्याने तालुक्यात बाधित रुग्ण असूनही त्यांची कागदावर नोंद नसल्याची स्थिती आहे.
व्याधीग्रस्त रुग्णांबाबत खासगी डॉक्टर धोका नको म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा अथवा उपचारांची नेमकी दिशा ठरविण्यासाठी चाचणी करण्याचा सल्ला देतात. मात्र सदृढ असलेले रुग्ण यापासून दूरच राहतात हे देखील यामागील महत्त्वाचे कारण आहे. त्याचाच परिणाम सध्या शहरातील जवळपास सर्वच क्लिनिकच्या बाहेर सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी घेवून नागरिक रांगेत उभे असल्याचे दृष्य बघायला मिळत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास खासगी पातळीवर का असेना नागरिकांनी उपचार अवश्य घ्यावे, त्याकडे दुर्लक्ष करु नये असे आवाहन वैद्यकीय जाणकारकारांकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आज 1,357 रुग्ण!
अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्येत वाढ होण्याची श्रृंखला आजही कायम असून जिल्ह्यात आज 1 हजार 357 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 501, नगर तालुका 149, राहाता 95, श्रीरामपूर 94, श्रीगोंदा 79, संगमनेर 62, पारनेर 59, राहुरी 50, कोपरगाव 42, पाथर्डी 40, अकोले 38, इतर जिल्ह्यातील 27, शेवगाव 26, जामखेड 23, लष्करी रुग्णालय व नेवासा येथील प्रत्येकी 19, भिंगार लष्करी परिसर व कर्जत येथील प्रत्येकी 16 व इतर राज्यातील दोन अशी एकूण 1 हजार 357 रुग्णांचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.