यूवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींचे शनिचौथर्यावर पूजन देवस्थान ट्रस्टने स्वागत करुन केले धाडसी कृतीचे कौतुक

नायक वृत्तसेवा, नेवासा
माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी यूवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी करवीर संस्थापिका ताराराणी यांचा संघर्षाचा आणि क्रांतीचा वारसा पुढे चालवत शनिशिंगणापूर येथे चौथर्यावर जाऊन शनैश्वरांची तेल वाहत विधीवत पूजा केली. देवस्थान ट्रस्टनेही त्यांच्या या कृतीचे स्वागत केले. पूर्वी शनिचौथर्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. काही वर्षांपूर्वी ती उठविण्यात आली असली तरी अनेक महिला अद्याप चौथर्यावर जाण्याचे धाडस करीत नाहीत.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अनेक अनिष्ट प्रथा व रूढींना पायबंद घातला होता. त्यांचाच वारसा संयोगिताराजे छत्रपती यांनी पुढे चालवत महिलांना चौथर्यावर न जाण्याची प्रथा होती, ती मोडीत काढली. यावेळी शनैश्वर देवस्थानचे चिटणीस अप्पासाहेब शेटे यांनी संयोगिताराजे यांच्या कृतीचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘संयोगीताराजेंनी अतिशय शांतपणे देवाचे दर्शन घेतले. कुठल्याही प्रकारे वेगळेपण न दाखवता पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट प्रथेला थारा न देता चौथर्यावर जाऊन शनैश्वराची मनोभावे पूजा करत आशीर्वाद घेतला. संयोगिताराजे छत्रपती यांनी आदर्श घालून देत आज नवा आयाम जनतेला दिला आहे. खरोखरपणे इतक्या चांगल्या पद्धतीने समाजाला नवी दिशा देता येते हे दाखवून दिले.’

करवीर छत्रपती घराण्याच्या सून असलेल्या संयोगीताराजेंनी चौथर्यावर जाऊ पूजा करताना कुणाचेही मन दुखणार नाही किंवा कुठलाही गदारोळ होणार नाही याची काळजी घेतली. देवस्थानाचे ट्रस्टी यांनी स्वतः पुढाकार घेऊन संयोगीताराजेंच्या कृतीचे समर्थन केले. यावेळी देवस्थानच्याच्या व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने संयोगिताराजे छत्रपती यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी यशवंत तोडमल, शुभम पांडुळे, भूषण तोडमल, संभाजी कदम, योगेश कवळे, अमर पाटील, प्रवीण पोवार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोगिताराजे छत्रपती या नेहमीच प्रत्येक आघाडीवर संभाजीराजे यांना साथ देताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण केले होते. तेव्हाही संयोगिताराजे आपल्या पतीसोबत शेवटपर्यंत ठाण मांडून होत्या. सध्या संभाजीराजे आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी राज्यभर दौरे करीत आहेत. त्यामध्येही त्यांची साथ लाभत आहे.
