परळी मल्टीस्टेटमध्ये राहुरी ग्रामस्थांचे ऐंशी लाख अडकले
परळी मल्टीस्टेटमध्ये राहुरी ग्रामस्थांचे ऐंशी लाख अडकले
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील परळी मल्टीस्टेट पतसंस्थेत ग्रामस्थांचे 80 लाख रुपये अडकले आहेत. संस्थेची शाखा अनेक दिवसांपासून बंद असल्याने वारंवार मागणी करुनही रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदार धास्तावले आहेत. याबाबत ठेवीदारांनी राहुरी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. जर संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदविला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समक्ष भेटून सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ काळे, आप्पासाहेब ढूस, अरुण ढूस, डॉ.सुधीर क्षीरसागर, डॉ.विलास पाटील, डॉ.नामदेव कडू, सागर गडाख, मच्छिंद्र टेकाडे, रेवजी सांबरे, सुनील महाडिक, रमेश वाळके, किसन टिक्कल यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरातील परळी मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेत ठेवी ठेवल्या आहेत. मात्र, संस्थेची शाखा कित्येक दिवसांपासून बंद आहे. पतसंस्थेच्या अधिकार्यांना फोन करून आमच्या ठेवी परत मिळण्यासाठी विनंती करीत आहोत. परंतु, आम्हांला आमच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. पतसंस्था बंद असल्याने आमची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी एप्रिल 2020 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात तकार दिली. त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही की गुन्हा नोंदविला नाही. त्यामुळे दुबार तक्रार देत आहोत. जर राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही तर, ठेवीदारांतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.