नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्र योगासन संघाचा बोलबाला! गोव्यात झाली स्पर्धा; पाच सुवर्णसह स्पर्धेतील निम्मी पदके पटकावली
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोव्यात पार पडलेल्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी नेत्रदीपक सादरीकरणाच्या जोरावर स्पर्धेतील योगासनांची निम्मी पदकं मिळवली. योगासनांच्या विविध चार प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकेरीसह दुहेरी गटातही उत्तम कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह तीन रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र योगासन संघाचा बोलबाला बघायला मिळाला.

पारंपरिक योगासनांच्या एकेरी प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या कल्याणी च्युटेने रौप्य तर छकुली सेलुकरने कांस्यपदक मिळवले. कलात्मक योगासनांच्या एकेरी प्रकारात वैभव शिरमे याने थरारक सादरीकरणातून महाराष्ट्र संघाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
उत्तर प्रदेशच्या प्रवीण पाठकने रौप्य तर हरयाणाच्या अभिषेकने कांस्यपदक मिळवले. कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारातही वैभव शिरमे याने हर्षल च्युटेच्या जोडीने, तर मुलींच्या गटात पूर्वा किनारे व प्राप्ती किनारे यांच्या जोडीने सुवर्णपदक मिळवताना महाराष्ट्र संघाची गुणतालिका उंचावत नेली. राजस्थानच्या पवन मुथा व प्रेमसिंग राजपुरोहित यांनी रौप्य आणि पश्चिम बंगालच्या अभय बर्मन व अंबर नहा यांना कांस्यपदके मिळाली. योगासनांच्या तालात्मक दुहेरी प्रकारातही महाराष्ट्राच्या मनन कासलीवाल आणि ओम वरदाई यांनी मुलांच्या गटात सुवर्ण तर पूर्वा आणि प्राप्ती किनारे या भगिनींनी रौप्यपदकाची कमाई केली. कलात्मक योगासनांच्या समूह सादरीकरणातही महाराष्ट्र संघातील मुलींच्या गटात छकुली सेलुकर, कल्याणी च्युटे, प्राप्ती किनारे, पूर्वा किनारे व सृष्टी शेंडे यांनी सुवर्ण तर मुलांच्या गटात वैभव शिरमे, हर्षल च्युटे, ओम वरदाई, मनन कासलीवाल आणि पवन चिखले यांच्या गटाने रौप्यपदक मिळवताना या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला.
सुहास पवळे, संदेश खरे, छाया मिरकर आणि नीलेश पठाडे यांनी योगासनांमध्ये तर ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सोनाली महापात्रा यांनी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंना नृत्य प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष सतीश मोहगावकर व सचिव राजेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.