हरिश्चंद्रगडावर सोनकीच्या फुलांनी फुलला निसर्ग! डोंगरदर्‍यातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना करतेय आकर्षित


नायक वृत्तसेवा, राजूर
निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असणार्‍या व निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या हरिश्चंद्रगड परिसरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये अनोखे चमत्कार पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. शेवटच्या सप्टेंबरच्या सप्ताहापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत पिवळ्या रंगाची सोनकी व खुरासणीची फुले परिसरातील हिरव्यागार डोंगरदर्‍यातील रानात पसरल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे.

पावसाचा जोर काहीसा कमी होतो. हिरवाकच दिसणार्‍या या हिरवळरुपी शालीला आता रानफुले व गवत फुलांची झालर आली असून, अनेक प्रकारची हरिश्चंद्रगडावर व रतनगडाच्या सभोवताली थाटात डोलत आहेत. सोनकळीच्या फुलांनी संपूर्ण जंगलालाच सोन्याचा मुलामा चढविल्यागत भास होताना दिसत आहे. भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक प्रकारची गवतफुले व रानफुलेही उगवली असून निसर्गाचा हा अद्भूत देखावा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. संपूर्ण परिसर रानफुलांनी बहरून गेला आहे, तर आशिया खंडातील सर्वांत दरी समजल्या जाणार्‍या सांदण दरीचा आनंद घेण्यासाठी आलेले शेकडो पर्यटक या फुलांची मनमोहक अदा आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी आतूर झाले आहेत.

या फुलांमध्ये कारव्यासारख्या झाडाला सात वर्षांतून एकदाच निसर्गाची देण असलेली फुले येत असून या कारव्याच्या झाडाचा उपयोग घरबांधणीसाठी व वाळल्यानंतर सरपणासाठी केला. काही फुलांचा आदिवासी बांधव आपले श्रद्धास्थान असलेल्या देवदेवतांना अर्पण करण्यासाठी करतात, तर काही फुलांचा वापर हा ठराविक आजारावर औषधांसाठी जातो. ज्याप्रकारे भंडारदर्‍याला पावसाअगोदरचा महोत्सव व पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात, अशीच पर्यटकांची पसंती हरिश्चंद्रगडवर फुलोत्सवाला मिळाली तर नक्कीच कास पठार म्हणून हा परिसर ओळखला जाईल.

हरिश्चंद्रगड परिसरात रानफुलांचे हे सौंदर्य निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. हा निसर्ग ठेवा अमूल्य असा आहे. निसर्गाचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत. जेणेकरून निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा लाभ आयुष्यभर घेता येईल.
– दत्तात्रय पडवळे (सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *