टाकळीभानमध्ये गटार तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात दुर्गंधीमुळे ग्राहक वर्ग मंदावल्याने व्यावसायिकही अडचणीत


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत असणार्‍या महाराष्ट्र टायर्स व उंडे अ‍ॅग्रो या दोन्ही दुकानांच्या मध्ये सांडपाणी वाहून नेणारी गटार तुंबल्याने या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. या तुंबलेल्या पाण्यामुळे डासांचे साम्राज्य वाढून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, दुकाने व व्यावसायिक वास्तव्यास आहेत. याच ठिकाणाहून ओढ्याकडे परिसरातील सांडपाणी वाहून जाणारी गटार आहे. ही गटार भुयारी असून महाराष्ट्र टायर्स व उंडे अ‍ॅग्रो या दोन्ही दुकानांच्या मध्ये उघडी असून त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे गटारीतून पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साचल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे या परिसरात खरेदीसाठी जाणारा ग्राहक वर्गही मंदावला असून व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत.

गेली अनेक वर्षे हा प्रश्न रेंगाळलेला असल्याने ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे काय असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून येथे सिमेंट नळी टाकून या साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह व्यावसायिकांनी केली आहे. याबाबत पदाधिकार्‍यांना अनेकदा सांगितले, पण अद्यापर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Visits: 216 Today: 1 Total: 2127422

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *