वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ ः अॅड.बोरावके
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ ः अॅड.बोरावके
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव शाखेचा स्तुत्य उपक्रम
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक प्रगतीत वृत्तपत्रांचा मोलाचा वाटा आहे. वृत्तपत्र आणि वाचक या दोघांमधील विक्रेता हा महत्त्वाचा दुवा आहे. न्याय हक्कासाठी, विक्रेत्यांचे समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड.रवींद्र बोरावके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगावच्यावतीने माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे गौरवपत्र सन्मानपूर्वक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विक्रेत्यांचा सन्मान ज्योती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड.रवींद्र बोरावके यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना बोरावके म्हणाले, वृत्तपत्रे मुद्रणाचे काम जितके कठीण असते त्याहीपेक्षा ते वितरण करण्याचे काम अतिशय कठीण असते. विक्रेता/वितरक वितरणाचे काम करत असताना ऊन, वारा, पाऊस अशा संकटाची तमा न बाळगता अतिशय तळमळीने व प्रामाणिकपणे करीत असतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात देखील विक्रेते स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून पहाटेच घराबाहेर पडून वाचकांच्या थेट घरापर्यंत वृत्तपत्रे पोहोचविण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. परंतु सर्वांना सोयी-सुविधा मिळत नाही. अद्यापही विक्रेता सर्वच सुविधांपासून वंचित आहेत. दिवसेंदिवस विक्रेत्यांच्या समस्या कमी होण्यापेक्षा वाढत असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन न्याय हक्क मिळवून देणार असल्याचे बोरावके म्हणाले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष जाधव, जनार्दन जगताप, फकीर टेके, हाफिज शेख, योगेश गायके, लक्ष्मण जावळे, विनोद जवरे, तर विक्रेता संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, दत्तात्रय बिडवे, हरीभाऊ देवरे, प्रकाश देवरे, प्रशांत चिमणपुरे, राजेश हाबडे, मेहेंद्र टोरपे, संतोष पवार, नितीन पिंपळे, सतीश जाधव आदी विक्रेते आणि पत्रकार उपस्थित होते. प्रास्तविक योगेश गायके यांनी केले तर सूत्रसंचालन विनोद जवरे यांनी करुन आभार जनार्दन जगताप यांनी मानले.