भोकर शिवारात सहा मोटारसायकल चोरीचा प्रयत्न फसला आशांकुर संस्थेच्या सीसीटीव्हीत दोन चोरटे झाले कैद
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भोकर शिवारातील भामाठाण रस्ता व जगतापवस्ती परीसरात एकाच रात्री सहा मोटारसायकल चोरीचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांना रात्र जागवून काढावी लागली. तर यातील दोन चोरटे आशांकुर संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. या चोरट्यांचा श्रीरामपूर तालुका पोलीस शोध घेत आहेत.
26 सप्टेंबरच्या मध्यरात्री भोकर शिवारातील असलेल्या महानुभव आश्रमाकडे चोरटे गेले असता आश्रमाने स्वत:च रखवालीचा निर्णय घेऊन प्रहरी सेवा सुरू केल्याने त्यांनी आपला मोर्चा जगतापवस्तीकडे वळविला. सुरेश साळुंके यांची मोटारसायकल त्या चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु साळुंके यांना जाग आल्याने तो पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी नामदेव ढाले यांच्या वस्तीकडे आपला मोर्चा वळविला पण येथेही ढाले यांना जाग आल्याने तेथेही चारेट्यांना ती मोटारसायकल तेथेच सोडून पळ काढावा लागला. या दरम्यान परीसरातील शेतकर्यांनी चोरटे आले असल्याची माहिती एकमेकांना दिली.
त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा भोकर-भामाठाण रस्त्याकडे वळविला. जगताप वस्तीवरील सेवानिवृत्त आयुक्त प्रकाश जगताप यांच्या शेतात राहत असलेले प्रकाश मनाळ यांची मोटारसायकल पळविण्याचा प्रयत्न झाला, वायर तोडल्या; परंतु हॅन्डल लॉक न तुटल्याने त्यांना ती मोटारसायकल काही अंतरावर नेऊन टाकून पळ काढला. त्यानंतर आशांकुर महिला केंद्र या सामाजिक संस्थेत चोरट्यांनी प्रवेश करत कार्यालयासमोरील दोन मोटारसायकल पळविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या दोन्ही मोटारसायकलला चावी असल्याने चोरट्यांनी चावी लावून कार्यालयाच्या गेटपर्यंत धक्का देत दुचाकी आणली.
पण येथे सुदैवाने साळुंके व ढाले यांनी परीसरातील शेतकर्यांना मोबाईलद्वारे संपर्क केलेला होता. त्यामुळे सतर्क झाले होते. येथील भाजपाचे तालुका संघटक सतीश शेळके व दत्तात्रय काळे हे बाहेर येऊन चोरट्यांची वाट बघत होते. त्याच दरम्यान आशांकुर केंद्रातील मोटारसायकल घेऊन ते चोरटे गेटपर्यंत आले असता पुढे शेतकरी जागे असल्याचे लक्षात आल्याने ती दुचाकी तेथेच सोडून दुसरी दुचाकी घेऊन पाठीमागून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु या केंद्राच्या बाहेर निघण्यास दुसरा मार्ग नसल्याने त्यांना तीही मोटारसायकल सोडून पळ काढावा लागला.
या दरम्यान येथील पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी रात्रगस्तीच्या पथकाशी संपर्क करून गस्त पोलीस दाखल झाले होते. तेवढ्यात गावालगत असलेल्या लक्ष्मीमाता मंदिराजवळ एक सायकल व एक मोटारसायकल पडलेली असल्याचे काहींच्या लक्षात आले म्हणून पोलिसांचे गस्ती पथक व नागरिकांनी त्या साधनाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी भामाठाण रस्ता परिसरात दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी बाळासाहेब पटारे यांच्या घरासमोरील दुचाकी पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु अनिता बाळासाहेब पटारे यांचे लक्षात येताच त्या चेारट्यांना पटारे यांनी घरातून आवाज देत ओरडा केल्याने तीही मोटारसायकल सोडून त्या चोरट्यांना पळ काढावा लागला.