आषाढीच्या दिनी संगमनेरात दहा गोवंश जनावरांना जीवदान! शहर पोलिसांची कारवाई; साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह चौघांवर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आयुष्यभर अहिंसेची कास धरणार्या महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी शहराला बट्टा लावण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता हिंदुधर्मियांच्या पवित्र समजल्या जाणार्या आषाढी एकादशीला पुन्हा घडू पाहणारा तसाच प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना वेळीच या प्रकाराची कुणकूण लागल्याने त्यांच्या आदेशाने झालेल्या कारवाईत शहर पोलिसांनी ऐन एकादशीच्या दिनी दोन वाहनांतून कत्तलखान्याच्या दिशेने निघालेल्या तब्बल दहा गोवंश जनावरांची कसायांच्या हातातून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली असून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. महाराष्ट्राची मोठी परंपरा असलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्राण्यांची कत्तल केली जावू नये असा प्रघात असतांनाही गोवंश जनावरांची कत्तल करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरातील परंपरावाद्यांकडून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता.10) सकाळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार भारतनगरमधील कत्तलखान्यांमध्ये कत्तलीसाठी काही गोवंश जनावरे आणली जाणार असल्याचे त्यांना समजले. याबाबत कारवाईसाठी त्यांनी पोलीस पथकाची नेमणूक करुन त्यांना आवश्यक त्या सूचना देत रवाना केले. त्यानुसार पोलीस पथकाने जोर्वे रस्त्यावरील फादरवाडी परिसरात नाकाबंदी केली. या दरम्यान दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास जोर्वेकडून संगमनेरकडे एकामागोमाग दोन वाहने येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी दोन्ही वाहनांना थांबण्याचा इशारा करीत त्यांना रस्त्याच्या बाजूला उभे केले. त्यातील महिंद्रा कंपनीच्या पिकअप वाहनाची (क्र.एम.एच.12/के.पी.1757) तपासणी केली असता त्यात गोवंश जातीची सात जनावरे अतिशय दाटीवाटीने आणि निर्दयीपणाने बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. वाहन चालकास त्यांची ओळख विचारली असता त्याने आपले नाव गणेश दगडू कदम (वय 32, रा.करुले) असल्याचे व सदरची जनावरे महंमद अलीम कुरेशी (रा.मोगलपुरा) याची असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सदर पिकअप वाहनासोबत असलेल्या छोटा हत्ती (क्र.एम.एच.41/ए.जी.4999) वाहनाची झडती घेतली असता त्यातही पोलिसांना गोवंश जातीची तीन जनावरे आढळून आली.
त्याच्या चालकाला नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव परवेज याकूब कुरेशी (वय 30, रा.भारतनगर) असल्याचे सांगत सदरील जनावरे सालीम उर्फ सोनू कुरेशी (रा.संगमनेर) याच्या मालकीची असल्याचे पोलिसांना सांगितले. दोन्ही वाहने, त्यांचे चालक व एकूण दहा जनावरे ताब्यात घेत पोलिसांनी जनावरांची रवानगी सायखिंडीच्या पांजरपोळमध्ये केली व दोन्ही वाहनासह त्यांच्या चालकांना पोलीस ठाण्यात आणले. पोलीस नाईक गजानन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील चारही आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित कलमांसह प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत दोघांना तुरुंगात टाकले आहे.
गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिनीच अहमदनगर पोलिसांनी संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर छापे घातले होते. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 72 जिवंत जनावरांची सुटका करीत एक कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला होता. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरल्याने या घटनेनंतर संगमनेरातील गोवंश कत्तलखाने राज्यात कुप्रसिद्ध झाले. त्याचा बट्टा पुसण्याचे काम सुरु असताना रविवारी (ता.10) हिंदुधर्मियांच्या पवित्र आषाढी एकदशीच्या दिनीच पुन्हा एका कत्तल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी आणलेली गोवंश जनावरे कत्तलीच्या वेदीपर्यंत पोहोण्यापूर्वीच पोलिसांनी मुक्त केल्याने पुढील अनर्थ टळला.
महावीर जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिनी कोणत्याही जनावरांची कत्तल करु नये व उघड्यावर मांस विक्रीही करु नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाते. या सणांच्या आधीच आपापल्या कार्यक्षेत्रातील कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने यांना याबाबत नोटीसाही बजावल्या जातात. राज्यात कायद्याने गोवंशाची कत्तल करण्यास मनाई आहे, त्यामुळे गोवंशाचे कोणतेही अधिकृत कत्तलखाने नसल्याने त्यांना अशाप्रकारच्या नोटीसा बजावण्याचा प्रश्न नसतो. मात्र त्यांनी लोकभावनेचा विचार करुन किमान अशावेळी आपले बेकायदा उद्योग बंद ठेवले पाहिजेत असे मत काहींनी व्यक्त केले आहे.