सहाय्यक कृषी अधिकार्याचे दुसर्यांदा विकृत चाळे! संगमनेर बसस्थानकात नागरीकांनी चोपला; तालुका कृषी अधिकारी धावले ‘पुन्हा’ मदतीला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रोडरोमिओ, टवाळखोरांकडून महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना नियमित घडतच असतात, संगमनेर मात्र त्याला अपवाद ठरतंय की काय असेच काहीसे चित्र समोर आले आहे. या घटनेत तालुक्याच्या पठारभागात कार्यरत असलेला एक सहाय्यक कृषी अधिकारीच सार्वजनिक ठिकाणी आपल्या विकृतीचे प्रदर्शन करीत असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी सायंकाळच्या वेळी संगमनेर बसस्थानकात या अधिकार्याने चक्क एका महाविद्यालयीन तरुणीची छेड काढली. हा प्रकार लक्षात येताच स्थानकात जमलेल्या शंभरावर नागरिकांनी त्याला पकडून यथेच्छ चोपूनही काढले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीनही केले. मात्र यावेळीही तालुका कृषी अधिकारी त्याच्या मदतीला धावले आणि त्यांच्याच मध्यस्थीने अवघ्या सहा महिन्यांत दुसर्यांदा विकृत चाळे करणार्या या अधिकार्याला सहीसलामत सोडून देण्यात आले. दरवेळी तालुका कृषी अधिकारी या विकृताला का पाठिशी घालीत आहेत असाही प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी संगमनेरात आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात धावपळ सुरु होती. त्याचा गैरफायदा उचलून विकृत मनोवृत्तीने या परिसरात हेलपाटे मारणार्या तालुक्याच्या पठारभागातील एका सहाय्यक कृषी अधिकार्याने बसमध्ये बसण्याच्या गडबडीत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीची छेड काढली. त्या विद्यार्थिनीने त्याचा जागेवरच प्रतिकार करीत त्याला खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली असता आसपास मोठा जमाव गोळा झाला आणि त्यांना विषय लक्षात येताच ‘त्या’ विकृत अधिकार्यावर ‘जनता पडी’ सुरु झाली. त्यामुळे घाबरलेला हा विकृत स्थानकाच्या प्रवाशी प्रवेशद्वारातून सुसाट वेगाने बाहेर पळाला. मात्र नागरिकांनी पाठलाग करीत त्याला स्थानकातील दत्त मंदिराजवळ पकडून पुन्हा यथेच्छ चोपले.

येथूनही तो निसटला आणि फाटलेल्या अंगावरील कपड्यांसह नवीन नगर रस्त्याच्या दिशेने धावला. काहीजणांनी यावेळीही त्याचा पाठलाग करुन वीज मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याला पुन्हा पकडले आणि तेथून थेट शहर पोलीस ठाण्यात नेवून त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी तेथे हजर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचार्याने त्याचा चेहरा पाहताच अवघ्या काही महिन्यांपूर्वी याच विकृताला विद्यार्थिनीची छेड काढताना आपण पकडल्याची व नंतर तालुका कृषी अधिकार्यांच्या मध्यस्थीने त्याला सोडून द्यावे लागल्याची आठवण करुन दिली. यावेळी पोलिसांकडून संबंधित विद्यार्थिनीकडून तक्रार नोंदवून घेण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच तालुक्याचे कृषी अधिकारी ‘त्या’ विकृताचे देवदूत बनून पुन्हा पोलीस ठाण्यात हजर झाले.

यावेळीही त्यांनी मध्यस्थाची भूमिका बजावताना दयावया व विनंती आर्जवे करीत त्या विकृताला माफी मिळवून देत पुढील चाळ्यांसाठी त्याची सहीसलामत सुटका घडवून आणली. अवघ्या काही महिन्यापूर्वी विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतरही त्याच्यावर कारवाई न झाल्याने त्यातून त्याचे मनोबल वाढले आणि सोमवारी त्याने पुन्हा एकदा तसाच प्रकार केला. यावेळी तालुका कृषी अधिकार्यांनी त्याचा बचाव केल्याने कृषी अधिकारी नेमकं काय करताहेत हेच समजायला मार्ग नाही. कदाचित त्याच्याकडून छेडछाडीच्या पुढे जावून अत्याचारासारखा प्रकार घडण्याची तर कृषी अधिकारी प्रतीक्षा करीत नाही ना? अशी शंकाही दोन-दोनवेळा विकृतीला पाठबळ देण्याच्या या प्रकारानंतर येवू लागली आहे.

