घारगावचा वीज अभियंता शेतकर्‍यांनाच घेतोय दमात! पाच दिवसांपासून पुरवठा खंडीत; मात्र कर्तव्य सोडून साहेब संगमनेरात मुक्कामी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधीच दुष्काळाने व्यापलेला परिसर आणि त्यातच समन्यायी पाणी वाटपाचे संकट अशा दृष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला आता वीज वितरण कंपनीतील काही मुजोर अधिकार्‍यांच्या बेधुंदशाहीचा सामना करण्याची वेळ आली आहे. या धक्कादायक घटनेत सलग पाच दिवस वीज पुरवठा खंडीत असल्याने पिकांना पाणी भरता येत नसल्याची तक्रार घेवून आलेल्या खंदरमाळच्या शेतकर्‍यांना चक्क घारगाव वीज उपकेंद्रातील सहाय्यक अभियंत्यांनी फोनवरुनच ‘दमात’ घेण्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे घारगावमध्ये कर्तव्यावर असलेले हे महाशय त्यावेळी संगमनेरात मुक्कामी असल्याचेही समोर आले आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतरही अद्याप खंदरमाळचा वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज सकाळी उपकेंद्रात येवून ठिय्या आंदोलनही सुरु केले आहे. एकीकडे राज्य सरकार दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी दररोज काहीतरी नवीन घोषणा करीत असताना, दुसरीकडे शासनाच्या धोरणांनाच हरताळ फासण्याचे काम प्रशासनातील काही अधिकारी करीत असल्याचे या घटनेतून स्पष्टपणे समोर आले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर हजर झालेल्या याच अधिकार्‍याने घारगाव वीज केंद्रात केलेला धिंगाणाही समाज माध्यमात व्हायरल झाला होता, त्यानंतर आता थेट शेतकर्‍यांनाच दमात घेत असल्याचा व्हिडिओही समोर आल्याने या ‘बेधुंद’ अधिकार्‍याला नेमके कोणाचे पाठबळ आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शुक्रवारपासून (ता.२७) पठारावरील नांदूर खंदरमाळ परिसराला वीज पुरवठा होणार्‍या खंदरेश्वर फिडरवरुन होणारा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सलग तीन दिवस अशीच स्थिती कायम राहिल्याने तेथील सुमारे ३० ते ४० शेतकर्‍यांनी सोमवारी (ता.३०) रात्रीच्यावेळी घारगाव वीज उपकेंद्राचे कार्यालय गाठले. यावेळी कार्यालयात केवळ एकच कर्मचारी हजर होता. त्याला विद्युत पुरवठ्याबाबत काहीच माहिती नसल्याने त्याने त्याच्याच मोबाईलवरुन या केंद्राचे सहाय्यक अभियंता दीपक थोरात यांना फोन करुन सदरचा प्रकार सांगितला. त्यावर कारवाई करण्याऐवजी आधीच मुख्यालय सोडून संगमनेरात मुक्कामी गेलेल्या या महाशयांनी मोबाईल फोनचा स्पीकर सुरु करुन तक्रारीसाठी आलेल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला.

सुरुवातीला काही प्रमुख शेतकर्‍यांनी तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने रात्री-बेरात्री पाणी भरण्यासाठी रानात जावूनही पिकांना पाणी देता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सध्या परिसरात बिबट्याची भीती असल्याने व त्यातच उभी पिकं जळून जाण्याचेही भय असल्याने लवकरात वीज पुरवठा सुरु करावा अशी विनंतीही या शेतकर्‍यांनी केली. त्यावर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अभियंता महाशयांनी समोरुन तक्रार करणार्‍या शेतकर्‍यांनाच दमात घ्यायला सुरुवात केली. यावेळी अभियंता थोरात यांनी खंदरमाळच्या शेतकर्‍यांनाच उद्देशून ‘मुळा नदीपात्रात काय चालतंय ते मला माहिती नाही का? पण, मी तुमच्या गावाकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही म्हणतं असाल तर मी स्वतः येवून अर्धा तासात तुमचा वीज पुरवठा सुरु करतो. पण, उद्यापासून माझे १५ ते २० वायरमन तुमच्या गावातच थांबतील आणि नदीत सोडलेल्या सगळ्या मोटारी जप्त करुन तुमची वीज चोरी उघडी करतील. त्याची बातमीही मी स्वतः माध्यमांना देईल, तुमच्या म्हणण्यानुसार मी वीज सुरु करतो, पण त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतील.’ असा दमच या अधिकार्‍याने भरला.

त्यामुळे निराशा झालेले शेतकरी अधिकारशाहीसमोर हतबल होवून माघारी गेले. या घटनेनंतर मंगळवारी तरी वीज पुरवठा सुरु होईल अशी अपेक्षा खंदरमाळच्या शेतकर्‍यांना होती. मात्र या अधिकार्‍याची मुजोरी इतकी आहे की इतके सगळे घडूनही गेल्या पाच दिवसांपासून खंदरमाळचा वीज पुरवठा अद्यापही सुरु झालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर आज (ता.१) थेट घारगाव वीज उपकेंद्र गाठून कार्यालयातच ठिय्या दिला आहे. त्यामुळे सध्या घारगावचे वीज केंद्र आंदोलनाच्या झळांनी तापले असून वृत्त लिहेपर्यंत खंदरमाळच्या शेतकर्‍यांचे समाधान झालेले नव्हते.

तालुक्याचा पठारभाग सतत अवर्षणग्रस्त राहिला आहे. यावर्षी तर पावसानेही पाठ दाखवल्याने पठारावरील बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा पावसाच्या अभावाने विहिरीतील पाण्याची पातळीही कमालीची खालावल्याने खंदरमाळच्या चार ते पाच शेतकर्‍यांना एकत्रितपणे एकाच विहिरीतून पाणी उचलावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाचा पाणी उचलण्याचा दिवस निश्चित केलेला असताना त्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांना आपल्या उभ्या पिकांना पाणी देणे अशक्य होवून बसले आहे. त्यांची ही अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी घारगावच्या वीज उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता दीपक थोरात यांनी हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनाच दमात घेण्याचे प्रकार सुरु केल्याने पठारभागात मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेधुंद अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.


काही महिन्यांपूर्वी दीपक थोरात नावाचे हे महाशय भरदुपारी मद्यधुंद अवस्थेत घारगावच्या वीज उपकेंद्रात शेतकरी व ग्राहकांशी अरेरावी करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. त्याबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी या उद्धट आणि संवेदनहीन अभियंत्याला पाठीशी घालण्यात आले होते. यावेळी मात्र त्यांनी आधीच दुष्काळात पिचलेल्या शेतकर्‍यांनाच दमात घेण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे, यावेळी तरी या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे दखल घेतील का? की शासनाच्या शेतकरी हिताच्या घोषणा फक्त बोलाच्याच ठरतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 236 Today: 1 Total: 1115728

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *