बिरोबाबन येथील वीरभद्र महाराज मंदिरात चोरी चांदीच्या पादुका लांबविल्या तर दानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसला
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी जवळील बिरोबाबन येथील वीरभद्र महाराज मंदिरातील चांदीच्या पादुका अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या आहेत. तसेच कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. या मंदिरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे आता आव्हानात्मक झाले आहे.
वीरभद्र मंदिरातील चांदीच्या पादुका चोरी प्रकरणामुळे शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हे मंदिर पंचक्रोशीतील आराध्य दैवत आहे. या चोरीचा शोध पोलिसांनी तत्काळ लावावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
याबाबत मंदिराचे पुजारी हरिभाऊ भगत यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (ता.३०) रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवून मंदिरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मंदिराचे पुढील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व मंदिरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला.
दानपेटीचे कुलूप न तुटल्याने त्यांनी मंदिरासमोरील दीड किलो चांदीच्या पादुका चोरून नेल्या असल्याचे सांगितले आहे. बिरोबाबन येथील भाविकांनी या घटनेची माहिती देताच शिर्डी पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे. अशा विकृत मानसिकतेचा पोलिसांनी तपास करून कारवाई करावी, अशी मागणी नानासाहेब काटकर, संपत जाधव, रमेश बनकर, प्रवीण बनकर, संदीप बनकर, संदप काटकर, विकास धूळसैंदर, बाळासाहेब काटकर, चेतन बनकर, वीरभद्र भगत हरी बनकर आदिंसह भाविकांनी केली आहे.