श्री बाळेश्वर बचत गटाचे काम इतरांना प्रेरणादायी ः फटांगरे बचत गटाचा स्नेहमेळावा; गुणवंत पाल्यांचाही केला सन्मान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्री बाळेश्वर प्राथमिक शिक्षक बचत गटाचे कार्य आर्थिक बचतीचा मंत्र देणारे व इतरांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी केले. बचत गटाच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास आवारी, सुनील ढेरंगे, इंद्रभान पावसे, रमेश वाळुंज, भाऊसाहेब काळे यांसह बचत गटातील सर्व सदस्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळेश्वर प्राथमिक शिक्षक बचत गटाचे अध्यक्ष भरत काळे हे होते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच कन्यादिनानिमित्त सर्व मुलींच्या हस्ते केकही कापून सर्व कन्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथींचा परिचय सदानंद डोंगरे यांनी करून दिला. प्रास्ताविक बचत गटाचे सचिव सुनील घुले यांनी करून बचत गटाच्या संपूर्ण कार्याचा लेखाजोखा सादर केला. वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा उहापोह केला. तालुक्यातील सर्वात कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करणारा हा एकमेव बचतगट असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या सभासदांचा व सभासदांच्या पाल्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ग एकच्या पदावर नेमणूक झालेल्या प्रतीक्षा काळे, प्रज्ञा गाडेकर, श्रीपाद भागवत या तीन पाल्यांचाही समावेश होता. बचत गटातर्फे झालेल्या या सत्काराने सर्व पाल्ये भारावून गेली होती. सत्काराला उत्तर देताना त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत आम्हांला आपल्या परिवाराचा सन्मान हा जीवनात सतत प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त केल्या. दीप्ती डोंगरे, प्रणाली काळे, ज्ञानेश्वरी मदने, कौस्तुभ पावसे यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बचत गटाचे संस्थापक सचिव सुनील ढेरंगे, सदस्य इंद्रभान पावसे, भाऊसाहेब काळे, विनोद उकिर्डे, उषा गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक विलास आवारी यांनीही बचत गटातील सर्व शिक्षकांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे मनोगत व्यक्त केले.
दिवाळीनिमित्त सर्व सभासदांना आकर्षक भेट देऊ व पुरुषांप्रमाणेच महिलांचाही बचत गट भविष्यात सुरू करू, असे आश्वासन आपल्या अध्यक्षीय भाषणात भरत काळे यांनी दिले. याप्रसंगी शुभमंगल कन्यादान योजनेच्या धनादेशाचे वितरण नारायण सुपेकर यांच्या परिवाराला करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजनाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचत गटातील सदस्य विलास दिघे, कैलास भागवत, शिवाजी नरवडे, सुभाष औटी, रोहिदास गाडेकर, सतीशकुमार तळपे, बाबासाहेब हारदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने व दिगंबर फटांगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील गुळवे यांनी केले.