ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला पिकअपची धडक एक ठार, एक जखमी; संगमनेर-राजापूर पुलावरील घटना

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर-राजापूर पुलावरून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून पिकअपने जोराची धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला तर एक जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (ता.18) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास पुण्याकडून-नाशिककडे जाणार्‍या संगमनेर-राजापूर रस्त्यावरील पुलावरील गुंजाळवाडी शिवाराजवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह (क्र. एमएच.17, एव्ही.8257) चालक संभाजी चिमाजी राळे (रा. देसवडे, ता. पारनेर, जि. अहमदगर) हा कारखान्याकडे घेऊन जात होता. त्याचवेळी पाठीमागून येणारी पिकअप (क्र. जीजे.05, बीव्ही.8212) ट्रॉलीवर मागून जोरदार आदळल्याने क्लिनर राहुल पाटील (वय 27, रा. जळगाव) हा जागीच ठार झाला तर चालक प्रभाकर सुरेश पाटील (वय 34) हा किरकोळ जखमी झाला आहे.

सदर अपघात झाल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मनेष शिंदे, पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात पिकअपचेही मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 218 Today: 1 Total: 1800774

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *