अहमदनगर जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरली! संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येतही घसरण कायम; शहरात आज अवघे अकरा रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील चार दिवसांपासून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या एक हजारांच्या आत आली असून आजही त्यात सातत्य कायम असल्याने जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओरसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आजही जिल्ह्यातील रुग्णगतीत मोठी घट होवून जिल्ह्यातून अवघे 530 रुग्ण समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातील संक्रमणातही घट होण्याची श्रृंखला कायम असून आज शहरातील अवघ्या अकरा जणांसह तालुक्यातील एकूण 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात अन्य तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 199 झाली आहे.
संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्यातील सुरवातीचे तीन आठवडे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचा उच्चांक करणारे ठरले होते. मात्र मे च्या शेवटच्या आठवठ्यात समोर येणार्या रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याने जिल्ह्याचा सरासरी वेग खालावला. त्याचा परिणाम मागील महिन्यात ‘रेड झोन’मध्ये असलेला जिल्हा ‘ग्रीन झोन’ मध्ये येण्यात झाला. चालू महिन्यात तर दररोजच्या रुग्णगतीला मोठा ब्रेक लागल्याचे चित्र दिसत असून मागील चार दिवसांपासून सलगपणे जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची संख्या हजाराच्या खाली आली आहे. आजतर रुग्णसंख्येत मोठी घसरण होवून जिल्ह्यातील अवघ्या 530 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज संगमनेर तालुक्यातील 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील सागर हौसिंग सोसायटीतील 57 वर्षीय महिला, जनता नगरमधील 36 वर्षीय महिला, इंदिरानगर मधील 30 वर्षीय महिलेसह आठ वर्षीय मुलगी आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35, 33, 25 व 18 वर्षीय तरुण आणि 80 व 30 वर्षीय महिलांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील 31 गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
त्यात खांडगाव येथील 25 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 90 व 85 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 32 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगी, श्रीराम नगरमधील चार वर्षीय बालक, निमगाव बु. येथील 53 वर्षीय इसम, धांदरफळ बु. येथील 25 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 65 व 50 वर्षीय महिलांसह 52 वर्षीय इसम व 24 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 45, 35 व 29 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 22 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 15 वर्षीय मुलगा, साकूर येथील 60, 53 व 32 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण,
रणखांब येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळे येथील 42 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 45 वर्षीय इसम, बोटा येथील 28 वर्षीय तरुण, काकडवाडीतील 32 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 42 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 50 वर्षीय महिलेसह 23 व 22 वर्षीय तरुण, कनोलीतील 15 वर्षीय मुलगी, निमागव भोजापूर येथील 40 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 61 वर्षीय महिला, समनापूर येथील 27 वर्षीय तरुण, झोळे येथील 39 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगा व 12 वर्षीय मुलगी,
सावरगाव तळ येथील 50 वर्षीय इसम, राजापूर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिबलापूर येथील 41 व 18 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 30 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 48 वर्षीय महिला, खांबे येथील 52 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर येथील 50 व 35 वर्षीय दोन महिलांसह 45 वर्षीय इसम व 16 वर्षीय मुलगा, कर्जुले पठारावरील 45 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलगा, सायखिंडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि अन्य तालुक्यातील समशेरपूर येथील 60 वर्षीय महिला आणि श्रीरामपूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून संपूर्ण जिल्ह्यातून आज केवळ 530 रुग्ण समोर आले. त्यात सर्वाधिक 68 रुग्ण संगमनेर तालुक्यातून तर शेवगाव 66, पारनेर 58, नेवासा 49, जामखेड 41, पाथर्डी 37, श्रीगोंदा 36, अहमदनगर महापालिका क्षेत्र व कर्जत प्रत्येकी 34, श्रीरामपूर 33, राहाता व राहुरी प्रत्येकी 18, नगर ग्रामीण 15, अकोले 13, कोपरागाव 5, इतर जिल्ह्यातील चार व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.