समन्यायी पाणी वाटप कायद्यातून नाशिक व नगर जिल्ह्यांचे वाळवंट! जायकवाडीच्या पाण्याचा मुक्त वापर; यंदाही ११ हजार दशलक्ष घनफूटाची तुट भरावी लागणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाश्वत पाणलोटाचा अभाव असतानाही पैठणनजीक बांधला गेलेला महाकाय जायकवाडी जलाशय आता गोदावरी उर्ध्व भागातील नाशिक व नगर जिल्ह्यांच्या मुळावरच उठला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी तुडूंब भरलेल्या या धरणातून वर्षभरात रब्बी व उन्हाळी हंगामात मनसोक्त पाण्याची उधळण आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाल्याने आजमितीस धरणातील एकूण पाणीसाठा ६० तर उपयुक्त पाणीसाठा ४७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये १५ ऑक्टोबर रोजी या धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६५ टक्के असणे आवश्यक असल्याने यावर्षी धरणातील तुटीचा आकडा तब्बल १४ हजार दशलक्ष घनफूटावर पोहोचला आहे. त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक होवू लागले असून उर्ध्व भागातील शेतकर्यांनी मात्र पाणी सोडण्यास तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून यंदाही जायकवाडीचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आठमाही सिंचनाची शाश्वती देणारे १०२ टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण मागील वर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्ष गोदावरी उर्ध्व भागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सोडावे लागणार नाही असा या दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांचा अंदाज होता. मात्र तुडूंब भरुनही जायकवाडी धरण व्यवस्थापन व मराठवाड्यातील राजकारण्यांनी गेल्या वर्षभरात रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात उपलब्ध पाण्याचा मनमानी पद्धतीने वापर करीत सात आवर्तनांमधून तब्बल ६७ हजार दशलक्ष घनफूट पाण्याची वारेमाप उधळपट्टी केल्याने पावसाळ्यापूर्वी या महाकाय जलाशयाचा पाणीसाठा अवघ्या ३३ टक्क्यांपर्यंत खाली आला. धरणातील पाण्याचे सुयोग्य नियोजन न झाल्याने यावर्षी पुन्हा एकदा समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत उभे राहिले असून त्यातून नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष उभा राहण्यास सुरुवात झाली आहे. तुडूंब भरलेल्या जायकवाडी जलाशयातील पाणी वापराची आकडेवारी पाहिल्यास विनासायस मिळणार्या पाण्याची कशा पद्धतीने उधळपट्टी झाली हे स्पष्टपणे समोर येते.
गेल्या वर्षी जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात रब्बीसाठी तीन तर उन्हाळ्यात चार आवर्तने घेण्यात आली. याशिवाय बिगरसिंचन व औद्योगिक कारणांच्या वापरासह बाष्पीभवनातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यय झाला. त्यामुळे जूनअखेर या धरणातील उपयुक्त पाणीसाठा २०.३ टीएमसी (२६.५० टक्के) इतका खालावला होता. यंदा एकीकडे नाशिक व नगर जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरीही गाठलेली नसताना मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात मात्र समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे यापूर्वी पेक्षा यावर्षी उर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्यास आत्तापासूनच नकार दिसत असून नाशिकसह मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास मोठा विरोध होत आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीचा विचार करता जायकवाडी धरणात एकूण २४.३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यात प्रामुख्याने नांदूर मधमेश्वरमधून सोडण्यात आलेल्या १६.५ टीएमसी तर भंडारदरा व निळवंडे धरणातून सोडलेल्या ३.६ टीएमसी अशा एकूण २० हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा समावेश आहे. या कालावधीतही जायकवाडी धरणातून पाण्याची उधळपट्टी करण्यात आली असून जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत कालव्यांद्वारे तीन टीएमसी, बिगर सिंचन व औद्योगिक वापर व उपसा सिंचन योजनांसाठी मिळून एकूण दोन टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. याशिवाय नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या मेंढेगिरी समितीच्या सूत्रानुसार ढगाळ वातावरणातही धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनात तब्बल २.३ टीएमसी इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यय झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यातून पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत आधीच खपाटीला नेण्यात आलेल्या या जलाशयातून ८ टीएमसीहून अधिक पाणी वापरण्यात आले आहे.
यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरण अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. भंडारदरा व निळवंडे धरणं भरलेली असली तरीही लाभक्षेत्रात मात्र पावसाअभावी दुष्काळी स्थिती आहे. संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील पावसाने सरासरीही गाठलेली नाही. अशीच स्थिती नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील धरणांची आहे. त्यामुळे यंदा खरीपाचा हंगाम वाया गेला, सोयाबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत रब्बी हंगामासाठी धरणांमधून मिळणार्या पाण्यावर गहू, कांदा, हरबर्याची पिकं हाती लागतील अशी बळीराजाला अपेक्षा असताना समन्यायी पाणी वाटपाचे भूत पुन्हा एकदा उभे राहिले आहे. अशातच या कायद्यान्वये जायकवाडीतील संभाव्य १४ हजार दशलक्ष घनफूटाची तूट भरुन काढताना नाशिक व नगरमधील धरणांमधून १० ते ११ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने भविष्यात जायकवाडी जलाशय या दोन्ही जिल्ह्यांचे वाळवंट करणारा ठरणार आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी पाणी सोडण्यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी उद्भवणार्या या गंभीर समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्य एकात्मिक जल आराखड्यानुसार पश्चिमवाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे सुमारे ११५ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोर्यात वळवण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपसा सिंचन योजनांची साखळी निर्माण करण्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रवाही पाणी वळण योजनांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. या सर्व योजनांसाठी ३० ते ३५ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज असून तो कधी खर्च केला जाईल याबाबत मात्र साशंकता असल्याने यापुढेही समन्यायी पाणी वाटप कायदा आणि त्यातून मराठवाडा विरुद्ध नाशिक-नगर असा संघर्ष बघायला मिळेल यात शंका नाही.
– हरिश्चंद्र चकोर
निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग-अहमदनगर