दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यास आपण कटिबद्ध ः डॉ. लहामटे अकोले ग्रामीण रुग्णालयात विशेष दिव्यांग तपासणी शिबिर


नायक वृत्तसेवा, अकोले
सरकार दिव्यांगांच्या प्रश्नांसंबंधी संवेदनशील असून जिल्हा शल्यचिकित्सकांचे मार्गदर्शनाखाली अकोले ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने तालुक्यातील दिव्यांगांसाठी विशेष दिव्यांग तपासणी शिबिर शुक्रवारी (ता.१३) अकोलेत झाले असून सर्व डॉक्टर्स दिव्यांगांच्या सवेसाठी आले होते. जसे व्यंग आहे तसे प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरातून अनेकांच्या अडचणी सुटल्या पण काही अडचण आल्यास माझा दर सोमवारी राजूरला जनता दरबार असतो तेथे यावे असे म्हणत दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यास आपण कटिबद्ध असल्याचे मत अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय अहमदनगर व अकोले ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात विशेष दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, नेत्रतज्ज्ञ डॉ. संतोष रासकर, मनसोपचार तज्ज्ञ डॉ. अशोक कराळे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. गोकुळ घोगरे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. कटारिया, डॉ. सुरेखा पोपेरे, डॉ. शंतनू रहाणे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. लहामटे म्हणाले, वर्षभरात एक शिबिर आपल्या तालुक्याला मिळत असते. त्यात शिस्त पाळली तर सर्वांना लाभ घेता येतो. सहकार्याची भूमिका घेतली तर सर्वांची तपासणी करता येते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहेत्रे यांनी शिबिराचे चांगले नियोजन केल्याबद्दल कौतुकही केले. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॅा कटारिया यांनी या दिव्यांग तपासणी शिबिराचे महत्व व कार्यप्रणाली समजून सांगितली. त्यानंतर उदघाटन होऊन सर्व तज्ज्ञ डॅाक्टरांनी तपासणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात रुग्णालय परिसरात दिव्यांग बांधवांची गर्दी झाली होती. सूत्रसंचालन डॉ. संदीप कडलग यांनी केले तर आभार डॉ. पूनम कानवडे यांनी मानले. याप्रसंगी दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर विशेष दिव्यांग तपासणी शिबिरात ५७४ दिव्यांगांची तपासणी होऊन २६९ दिव्यांग बांधव प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले. तसेच या शिबिरात अस्थीव्यंग विभागात २५५ जणांची तपासणी होऊन ९० प्रमाणपत्रासाठी पात्र, मानसोपचार विभागात १३९ जणांची तपासणी होऊन ८० प्रमाणपत्रासाठी पात्र, नेत्ररोग विभागात १४९ तपासणी होऊन ४७ जण प्रमाणपत्रासाठी पात्र, कर्णबधीर विभागात १३१ दिव्यांगांची तपासणी होऊन ४६ प्रमाणपत्रासाठी पात्र झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *