नवीन मूत्राशय बसवून रुग्णाला दिले जीवनदान! डॉ. हृषीकेश वाघोलीकरांची यशस्वी शस्त्रक्रिया


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राने उत्तर महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पुणे, मुंबई, नाशिकमध्ये होणार्‍या अवघड शस्त्रक्रिया संगमनेरात यशस्वी केल्या आहेत. यातीलच एक नामवंत मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. हृषीकेश वाघोलीकर यांनी तब्बल सात तास शस्त्रक्रिया करुन रुग्णाला आतड्यापासून नवीन मूत्राशय बसवून जीवनदान दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉ. वाघोलीकरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

देशातील नामवंत रुग्णालयांत मूत्रविकार विभागाचा अनुभव घेऊन उच्चशिक्षित असलेले डॉ. हृषीकेश वाघोलीकर संगमनेर येथे डॉ. वाघोलीकर हॉस्पिटलमधून रुग्णांची सेवा करत आहे. यापूर्वी देखील त्यांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करुन संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राचा राज्यभर ठसा उमटवला आहे. आता देखील एक पन्नासवर्षीय रुग्ण लघवीच्या त्रासामुळे एक दशकापासून त्रस्त होते. साधारणपणे कोणताही सामान्य व्यक्ती एकावेळेस ३०० ते ५०० मिलीपर्यंत लघवी स्वतःच्या मूत्राशयामध्ये साठवून ठेऊ शकतो. मात्र, या रुग्णाच्या मूत्राशयाची लघवी साठवण्याची क्षमता अतिशय कमी होऊन फक्त ५० मिली इतकीच राहिली होती. त्यामुळे त्यांना दर १५ ते २० मिनिटांनी लघवीला जावे लागायचे.

वारंवार लघवीच्या इन्फेक्शनमुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. ही तक्रार घेऊन रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉ. हृषीकेश वाघोलीकर यांना भेटले. गोळ्या औषधे देऊनही काहीच फरक पडला नाही. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया (ऑगमेंटेशन सिस्टोप्लास्टी) सूचवली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या लहान आतड्याचा ३० सेमी. लांबीचा एक तुकडा वेगळा केला जातो अणि त्यापासून गोलाकार नवीन मूत्राशय बनवला जातो. हे आतड्यांपासून बनवलेले नवीन मूत्राशय जुन्या मूळ मूत्राशयाला जोडले जाते. यामुळे मूत्राशयाच्या पिशवीची लघवी साठवण्याची क्षमता वाढते. हे करत असताना नवीन अणि जुन्या मूत्राशयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहील याची विशेष काळजी घ्यावी लागते, ही अत्यंत किचकट शस्त्रक्रिया डॉ. हृषीकेश वाघोलीकर, भूलतज्ज्ञ डॉ. रसिका वाघोलीकर यांच्यासह चमूने यशस्वी केली. यासाठी तब्बल सात तास वेळ लागला.

त्यानंतर रुग्ण पूर्वस्थितीत येण्यासाठी काळजी घेणेही आवश्यक होते. आतड्याची आतील जखम भरून येण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर पुढील ३ दिवस रुग्णाला उपाशी ठेवायचे होते. या दरम्यान सलाईनद्वारे शरीराच्या सर्व गरजा पूर्ण केल्या गेल्या. सर्व रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्ण पूर्वस्थितीत आला आणि अवघ्या आठ दिवसांतच रुग्णालयातून सुट्टी मिळाली. अशा पद्धतीची दुर्मिळ व मोठी शस्त्रक्रिया प्रथमच संगमनेरात झाली असावी. याबद्दल डॉ. हृषीकेश वाघोलीकर, डॉ. रसिका वाघोलीकर व कर्मचार्‍यांचे रुग्ण, नातेवाईक व वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *