अट्टल गुन्हेगार आदित्य सूर्यवंशी दोनवर्ष हद्दपार! प्रांताधिकार्‍यांचे आदेश; अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातही बंदी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोर्‍या, घरफोड्यांपासून ते थेट अल्पवयीन मुलींच्या इंभ्रतीला हात घालण्यापर्यंत मजल गेलेला अकोले नाक्यावरील कुख्यात गुन्हेगार आदित्य संपत सूर्यवंशी याला अखेर दोन वर्षांसाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. एकट्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित विविध गंभीर प्रकरणांसह त्याच्यावर एकूण अकरा गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस उपअधीक्षक तथा प्राधिकृत अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी चौकशीअंती सादर केलेल्या प्रस्तावावरुन प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी सदरील अट्टल गुन्हेगाराला पुढील दोन वर्षांसाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात वास्तव्य करण्यास मनाई केली आहे. त्याने तत्काळ दोन्ही जिल्ह्यांच्या हद्द सोडून आपल्या वास्तव्याचा पुरावा सादर करावा व नजीकच्या पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. येणार्‍या कालावधीत आणखी अनेकजणांना अशाच पद्धतीने हद्दीबाहेर काढले जाणार आहे.


याबाबत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार शहरातील अकोले नाका परिसरात राहणारा आदित्य संपत सूर्यवंशी (वय 22) या कुख्यात गुन्हेगारावर गेल्या अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत एकट्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 11 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात अनाधिकाराने घरात प्रवेश, धमकी, दंगल, मारहाण, चोर्‍या, घरफोड्या, दरोडा, महिलांचा विनयभंग, अल्पवयीन मुलीशी अश्‍लिल चाळे, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धमकी अशा नऊ गुन्ह्यांसह पोलिसांकडून सीआरपीसीच्या कलम 107 अन्वये केलेल्या दोन प्रतिबंधात्मक कारवायांचाही समावेश आहे.


सदरील इसमाचा सार्वजनिक वावर समाजाला घातक असल्याने त्याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर प्रांताधिकार्‍यांनी चौकशी तथा प्राधिकृत अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ति केली. त्यांनी वरील आरोपीच्या गेल्या दोन वर्षातील दाखल गुन्ह्यांची सखोल चौकशी करुन अहवाल सादर केला. त्यावरुन या अट्टल गुन्हेगारावर दाखल एकूण गुन्ह्यातील सहा प्रकरणं न्यायालयीन प्रक्रियेत असून सशस्त्र मारहाण, दंगल, धमकी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा आणि शासकीय कर्मचार्‍यांना धमकावण्याचे एकूण तीन गुन्हे अद्याप तपासावरच आहेत.

Visits: 4 Today: 1 Total: 21231

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *