पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची मालदाडच्या जंगलात आत्महत्या? पोलिसांना घातपाताचाही संशय; तालुक्यासह शहर पोलिसांचीही घटनास्थळी धाव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोनच दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन पोक्सोचा गुन्हा दाखल झालेल्या, मात्र तेव्हापासून पसार असलेल्या आरोपीचा मृतदेह मालदाडच्या जंगलात आढळून आला आहे. मयताच्या नातेवाईकांनी तालुका व शहर पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याची ओळख पटविली असता तो पोक्सोच्या गुन्ह्यात पसार असलेला विजय रावसाहेब कुटे असल्याचे समोर आले. घटनास्थळी मद्याची बाटली आढळून आली असून त्यावरुन त्याने विषारी औषध प्राशन केल्याची शक्यता आहे. त्याच्या शरीरावर कोठेही जखमा आढळल्या नसून पोलिसांनी घातपाताची शक्यताही नाकारलेली नाही. उत्तरीय तपासणीनंतरच पुढील कारवाई होणार आहे. साधारण पस्तीशीत असलेला हा तरुण सुकेवाडीत राहणारा होता, त्याने आपल्या वयाच्या निम्म्या असलेल्या एका सतरावर्षीय मुलीचा पाठलाग करीत तिचा विनयभंगही केला आणि जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात बुधवारी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदरचा प्रकार समोर आला. मालदाड परिसरातील एका नागरिकाला जंगलातून जाणार्या निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला एक मोपेड वाहन उभे असल्याचे दिसले. ज्या भागात सहसा कोणी फिरकत नाही अशा ठिकाणी मोपेड दिसल्याने त्या इसमाने उत्सुकता म्हणून आणखी जवळ जावून पाहिले असता मोपेडजवळच एकजण जमीनीवर पडलेला त्यांना दिसला. त्यांनी जवळ जावून पाहताच तो सुकेवाडीतील विजय रावसाहेब कुटे असल्याचे त्याने ओळखले. याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तालुका व शहर पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत त्याच्याजवळ मद्याची एक रिकामी बाटली आढळून आली असून त्यात मिसळून त्याने विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज आहे.

त्याच्या शरीरावर कोठेही मारहाण केल्याचे व्रण अथवा जखमा आढळलेल्या नाहीत. पोलिसांनीही उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्याशिवाय स्पष्टता येणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र घातपाताची शक्यताही नाकारलेली नाही. या वृत्ताने सुकेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या बुधवारी (ता.११) दुपारी बाराच्या सुमारास एक सतरावर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या सायकलवरुन महाविद्यालयात जात असताना विजय रावसाहेब कुटे या तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या प्रौढाने सुकेवाडी रस्त्यावर तिला अडवून; ‘तू मला फार आवडतेस, तू दुसर्या मुलांसोबत का बोलतेस?’ असे म्हणत त्याने तिची ओढणी खेचून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे ती विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. त्याचा गैरफायदा घेत त्याने ‘तू कोणाशी बोललीस तर..’ असा दम भरीत शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी आरोपी विजय सुकदेव कुटे (वय ३५, रा.सुकेवाडी) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ (अ), ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम ८, १२ प्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकाराने गावात बदनामी झाल्याने तो तणावात आला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे. तूर्त तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

