श्रीरामपूर पालिकेचा अजब कारभार; एकाच कामाची दोनदा निविदा नगरसेवकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्कल कामावर किरकोळ खर्चातून 10 लाखांचे काम करून त्याच कामासाठी पुन्हा 17 लाखांची निविदा मागवून 10 ते 12 लाखांचे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. अशा कामात बेजबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांविरुध्द कारवाई करण्याबाबत मुख्याधिकार्‍यांनी दिलेला शब्द पाळला नाही. याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक संजय छल्लारे व मीरा रोटे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.7) पालिकेत मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी चौकशी समिती नेमून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या काळात अटलबिहारी वाजपेयी सर्कल करण्यासाठी 17 लाख 6 हजार 146 रुपये खर्चाची निविदा मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या सहीने काढण्यात आले. त्या कामास संजय छल्लारे व मीरा रोटे यांनी हरकत घेतली, कारण श्रीरामपूर परिषदेमधील भूखंडावर 23 जून, 2020 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये किरकोळ काम सूचविले व ते सभेत मंजूर करून घेतले. 4 सप्टेंबर, 2020 रोजी काम करण्याचे सांगून सदरचे काम तत्काळ चालू करावे, असा आदेश दिला.

तद्नंतर तेथेच अटलबिहारी वाजपेयी सर्कल या नावाने त्याच कामाचे परत ऑनलाईन निविदा मागवली. सदर ठेकेदाराकडून जवळपास 10 लाख रुपयांची किरकोळ कामे करून घेतली. ती कामे पूर्ण झाली. अभियंता यांच्या सूचनेनुसार मे. व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स श्रीरामपूर, के. जी. पाटुले सावेडी, मे. प्रशांत गोलार कुकाणा या तीन एजन्सीला 9 नोव्हेंबर, 2021 रोजी आपल्या स्वखर्चाने दाखले दिले. पण त्याआधी त्या जागेवर सदरचे कामे झालेली होती. सदर कामे जवळपास 10 ते 12 लाखांचे काम पूर्ण झाले होते, पण 6 महिन्यानंतर त्याच कामाचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या सहीने निविदा काढून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली असा आरोप छल्लारे व रोटे यांनी केला. तेथील नगरपालिकेच्या प्रॉपर्टी, वस्तूची चोरी होत आहे हे निर्दशनास आणून देत त्या लोकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करुन कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. सदरील कामाची निविदा रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार अधिकार्‍याचा खुलासा मागवण्यात आला असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नेमून 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. दरम्यान, लेखी पत्र मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्याने माजी नगरसेवक संजय छल्लारे व माजी नगरसेविका मीरा रोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण स्थगित करून 15 दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असे स्पष्ट केले होते.

दरम्यान, लेखी आश्वासनानंतर 25 दिवसांत आजपर्यंत त्या अधिकार्‍यावर काहीच कारवाई झालेली नाही. तसेच समितीही नेमली नाही. तसेच समिती नेमून त्यावर कारवाई झाली नाही म्हणून मुख्याधिकार्‍यांच्या दालनात बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले. अखेर या अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी दोन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा चौकशी अहवाल येताच कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिले. या चौकशीसाठी नेवासा येथील नगरपंचायतचे स्थापत्य अभियंता प्रवीण कदम व नेवासा नगरपंचायत लेखापाल भाऊसाहेब म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली. धनंजय कविटकर उपमुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासनाचे पत्र संजय छल्लारे व सर्व सहकार्‍यांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या ठिय्या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे महासचिव हेमंत ओगले, राजू आदिक, रितेश रोटे, संजय साळवे, राहुल मुथ्था, राजू भांबारे, बोरावके, राजू सोनवणे, भगवान उपाध्ये, अण्णासाहेब डावखर, सुभाष तोरणे, मुन्ना पठाण, श्रीनिवास बिहाणी, पप्पू कुर्‍हे, अशोक उपाध्ये, प्रवीण नवले, नितीन पिपाडा, पुंडलिक खरे, नीलेश भालेराव, सुनील जगताप, शरद गवारे, सुरेश ठुबे, राजू डुक्करे, के. सी. शेळके, फिरोज शेख, देवेन पीडियार आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *