राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा ः थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले खरमरीत पत्र


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथाणपणा का आला? या प्रश्नांची खरी खरी उत्तरे महाराष्ट्राला हवी आहे. सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रासमोर सत्य मांडावे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे, ते म्हणतात राज्याची संपूर्ण आरोग्य व्यवस्था सलाईनवर गेली आहे. आरोग्यमंत्री म्हणतात याला काही मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा होत नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राज्यातली जी शासकीय रुग्णालये आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात फार मोठे काम केले आहे. गरीब माणसाला आधार देण्यात या रुग्णालयांचा मोठा वाटा आहे.

आम्हांला आठवते, कोविडच्या कठीण काळात हीच यंत्रणा जीव तोडून काम करत होती, याच यंत्रणेने महाराष्ट्रातल्या अनेक गंभीर रुग्णांना वाचवले. कारण तेव्हाच्या सरकारचा हेतू प्रामाणिक होता. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला संकटातून बाहेर काढण्याची आमची भूमिका होती. असे असताना, या वर्षात काय घडले की, ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे, शोध घेतल्यानंतर लक्षात येते की या संपूर्ण देशाचे मूळ हे राज्य शासनाच्या कारभारात आहे. शासनाचा गलथाणपणा आणि आरोग्य क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष याकाळात झाले आहे.

नांदेडसह इतर घटनांबाबत शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरुन काही निष्कर्ष काढले आहेत. त्यात सांगण्यात आलेली कारणे न पटण्यासारखी असल्यामुळे उच्च न्यायालयाने स्व-पुढाकाराने याचिका दाखल करुन त्या याचिकेच्या सुनावणीत शासनावर गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. शासनाला व संबंधित अधिकार्‍यांना या मृत्यूंबाबतची जबाबदारी दुसरीकडे ढकलता येणार नाही असे सुनावले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी मी करत आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *