कसारे गावातील गावकारभार्यांचा वाद विकोपाला परस्परविरोधी फिर्यादींवरुन संगमनेर तालुका पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कसारे गावातील गावकारभार्यांत मंगळवारी (ता.26) झालेले वाद विकोपाला जाऊन थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचले. यातून परस्परविरोधी फिर्यादींवरुन विनयभंग, दरोडा, अॅट्रॉसिटीसह मारहाण केल्याचे पाच जणांवर संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, गावकारभार्यांचा वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कसारे गावचे सरपंच महेश बोर्हाडे हे दुचाकीवरुन नातलगासोबत तळेगाव येथे दवाखान्यात येत होते. यावेळी कृष्णाजी सूर्यभान कार्ले, मच्छिंद्र हिरामण कार्ले (दोघेही रा.कसारे) यांनी पाठीमागून सरपंच बोर्हाडे यांच्या दुचाकीला त्यांचे वाहन आडवे लावले. त्यांना जाण्यास प्रतिबंध करुन त्यांच्या गळ्यात जुन्या चपलांचा हार घालून जातीवरुन अर्वाच्च शब्दांत पाणउतारा केला. हा वादा मिटविण्यासाठी मध्ये आलेल्या नातलगास धक्काबुक्की करुन ‘तुम्हाला किती केसेस करायच्या आहे त्या करा’ अशी धमकी देत निघून गेले. या प्रकरणी महेश अण्णासाहेब बोर्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरोधात गुरनं.475/2021 भादंवि कलम 341, 354, 323, 504, 506, 34, अनुसूचित जाती-जमाती अधिनियम 1989चे सुधारित अधिनियम 2016चे कलम 3 (1), (ड), 3 (1), (डब्ल्यू), (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी पतीसह दुचाकीवरुन घरी जात असताना महेश अण्णासाहेब बोर्हाडे, चंद्रकांत अण्णासाहेब बोर्हाडे व कोमल चंद्रशेखर पाखरे यांनी त्यांच्या दुचाकीवरुन येऊन फिर्यादीच्या पतीस म्हणाले की, ‘तुझी पत्नी सदस्य असताना तु मीटिंगसाठी ग्रामपंचायत कार्यालयात कसा काय येतो?’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादी मध्ये पडली असता त्यांचा विनयभंग व शिवीगाळ करत त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेऊन ‘आमच्या नादी लागला तर तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करु’ अशी धमकी दिली. यावरुन तालुका पोलिसांनी वरील तिघा आरोपींविरोधात गुरनं.476/2021 भादंवि कलम 394, 341, 354 (अ), (1), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पहिल्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे. तर दुसर्या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय खंडीझोड हे करत आहे.
