रात्रीच्यावेळी अनधिकृत बसथांबा बनलेल्या हॉटेल ‘काश्मिर’वर छापा! पोलीस उपअधीक्षक वाघचौरेंची कारवाई; मुद्देमाल हस्तगत करीत मालकाला झाली अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिसांकडून रात्री 11 वाजल्यानंतर संगमनेरातील सर्व दुकाने व आस्थापने बंद केली जातात. सदरचा प्रकार आता संगमनेरसाठी नियमित झाल्याचे मानले जात असतांनाही पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत काहीजण लपूनछपून व्यवसाय करीतच असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यात बहुतेक सर्वांच्याच मुखी नाव असलेल्या, मात्र तरीही आजवर कोणत्याही कारवाईपासून दूर असलेल्या बसस्थानकासमोरील हॉटेल काश्मिरवर आज पहाटेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी छापा घातला. यावेळी पोलिसांनी मनाई केल्यानंतरही सदरचा हॉटेलचालक अंतर्भागात ग्राहकांना बसवून खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कारवाई करीत हॉटेलचालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने रात्री उशिरापर्यंत छुप्या पद्धतीने व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत उपअधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.4) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक शिरीष वमने रात्रीच्या गस्तीवर असतांना अकोले नाक्यावर फिरणार्या तिघांना त्यांनी हटकले असता त्यांनी आपण हॉटेल काश्मिरमधून दुध पिवून घरी जात असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर उपअधीक्षक वाघचौरे मालदाड रोडवरील एकटीएमची पाहणी करण्यासाठी गेले असता त्या परिसरातही काही तरुण रस्त्यावर असल्याचे पाहून त्यांनी चौकशी केली, त्यांच्याकडूनही हॉटेल काश्मिरचा उल्लेख झाला.
त्यातून शहरात नागरिकांच्या रात्री उशिरापर्यंतच्या वावरासाठी सदरील हॉटेल कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी मालदाडरोडवरुन थेट हॉटेल काश्मिर गाठीत छापा घातला. यावेळी केलेल्या पाहणीत हॉटेलच्या अंतर्भागात दहा ते बारा ग्राहकांना बसवून हॉटेलमालक एका गॅस शेगडीवरील मोठ्या कढाईमध्ये दुध उकळतांना, तर त्या बाजूलाच असलेल्या दुसर्या शेगडीवर ठेवलेल्या कढाईत तेल उकळतांना आढळून आला. याशिवाय आतील भागात बसलेल्या ग्राहकांना दुध व चहाचे ग्लास दिले गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.
रात्री 11 वाजता शहर बंद झालेले असतांना सदरील हॉटेल सुरु ठेवण्यासाठी संबंधिताकडे तसा परवाना आहे का? याचीही चौकशी पोलिसांनी केली, मात्र हॉटेलमालकाने असा कोणताही परवाना नसल्याचे सांगताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी हॉटेलमधील दोन घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व दोन शेगड्यांसह अन्य मुद्देमालही जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब गाडेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी हॉटेलचा मालक अकबर नजीम शेख (वय 43, रा.कुरणरोड, गल्ली नं.11) याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तु कायद्याच्या कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्यांला अटक केली आहे. या कारवाईने रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.